विद्युत मीटरची वानवा
By Admin | Updated: May 11, 2014 19:11 IST2014-05-11T18:35:57+5:302014-05-11T19:11:29+5:30
८० ग्राहकांना हेलपाटे

विद्युत मीटरची वानवा
बोरगाव मंजू : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लालफीतशाहीमुळे बोरगाव मंजू येथील अनेक ग्रामस्थांना वीज पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. बोरगाव मंजू येथील वीज पुरवठा घेऊ इच्छिणार्या ८० ग्राहकांना अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अद्यापपर्यंत विद्युत मीटरअभावी वीज पुरवठा देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे येथील विद्युत कार्यालयात विद्युत मीटर उपलब्ध असतानाही विद्युत कर्मचारी या ग्राहकांना वारंवार विनंती केल्यानंतरही वीज पुरवठा देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बोरगाव मंजू वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे वीज ग्राहकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत आहेत. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही या ग्राहकांना वीज पुरवठा दिला जात नाही. ग्राहकांना यासाठी वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. येथील वीज वितरण प्रणाली कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्राहकांना तत्काळ नवीन मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
** मुख्यालयी राहण्याच्या नियमाला खो
कर्मचार्यांनी मुख्यालयी राहावे, या शासनाच्या नियमाला येथील विद्युत कर्मचार्यांकडून खो दिला जात असल्याचे चित्र आहे. वीज कर्मचार्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे; परंतु येथील बहुतांश वीज कर्मचारी हे बाहेरगावी राहतात. त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास, तो पूर्ववत करण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागतो. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बोरगाव मंजू परिसरात बुधवारी अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी मुख्यालयी नसल्यामुळे तो रात्रभर सुरळीत झाला नाही. त्यामुळे गावकर्यांना रात्र अंधारात काढावी लागली.