अकोल्यात १३ कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: November 14, 2014 23:55 IST2014-11-14T23:03:25+5:302014-11-14T23:55:52+5:30
मनपाच्या जलप्रदाय विभागाची देयके थकली.

अकोल्यात १३ कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अकोला: थकीत देयकांसाठी अकोला महापालिकेच्या १३ कंत्राटदारांनी आ त्मदहन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. जलप्रदाय विभागाची कामं करणारे हे कंत्राटदार २६ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या कंत्राटदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची देयके थकली आहेत.
महानगरात पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. जलवाहिनी दुरुस्तीचा कंत्राटदार आणि मनपामध्ये झालेला करार १४ जुलै रोजी संपुष्टात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात जलवाहिनी दुरुस्तीची निविदा जारी केली. प्रशासनाने लेखी आदेश न देता, कंत्राटदारांना काम सुरू करण्यास सांगितले; मात्र १ कोटी ३५ लाखांचे थकीत देयक प्रशासनाने अदा करावे, त्यानं तरच कामास सुरुवात करू, असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला. त्यामुळे प्रशासनाने देयक अदा न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी कंत्राटदारांनी बेमुदत उपोषण सुरू केले.
दरम्यान, कंत्राटदारांनी मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ७ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार मनपासमोर शुक्रवारी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी उपोषणकर्ते कंत्राटदार प्लास्टिकच्या बाटलीमध्ये रॉकेल घेऊन मनपासमोर अचानक दाखल झाले. काहींनी रॉकेलची बाटली खिशात लपवून आणली होती. त्यामुळे पोलिस आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांना ही बाब उशिरापर्यंत समजली नाही. पोलिसांनी बाटली जप्त करेपर्यंत काही कंत्राटदारांनी अंगावर रॉकेल ओतले होते. अग्निशमन दलाने कंत्राटदारांच्या अंगावर लगेच पाणी ओतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. पोलिस आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या १३ कंत्राटदारांना ताब्यात घेतले.
*सौम्य लाठी हल्ला
कंत्राटदार अचानकपणे अंगावर रॉकेल घेऊन मनपासमोर आले. त्यामुळे वाहनचालक आणि पादचार्यांची धावपळ उडाली. लगेच घटनास्थळी गर्दी झाली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी हल्ला करावा लागला.
*कंत्राटदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या १३ कंत्राटदारांवर सिटी कोतवाली पोलिसांनी प्र ितबंधात्मक कारवाई केली. यामध्ये मुरलीधर प्रल्हाद सटाले, शेषराव तुळशीराम मोरे, सुशील नारायण तिवारी, किशोर सुखदेव कराळे, प्रशांत लक्ष्मण गजभिये, अब्दुल रज्जाक शाह, शेख रफिक शेख रसुल, पुरुषोत्तम किसनराव गुडवाले, विवेक वसंतराव वाहुरकर, विराज सुरेशचंद्र निचळ, अनिल रंगराव देशमुख, गजानन सूर्यभान सोनटक्के आणि अनिल हिरामण उपासे यांचा समावेश आहे.