Efforts to make orphanage free India! - Shreya Bhartiy | अनाथालय मुक्त भारत बनविण्यासाठी प्रयत्न! - श्रेया भारतीय
अनाथालय मुक्त भारत बनविण्यासाठी प्रयत्न! - श्रेया भारतीय

- नितीन गव्हाळे
 लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशामध्ये दोन कोटी अनाथ मुले आहेत. ही मुले अनाथ म्हणून नव्हेतर स्वनाथ म्हणून जगावी. त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावेत. त्यांना कुटूंब मिळावेत. सध्या देशात ४१00 मुलांना दत्तक विधान करून कुटूंब मिळाले आहे. अनाथमुक्त, अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी शनिवारी सांगितले. अनाथ मुलांच्या पुर्नवसनासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

 
स्वनाथ फाऊंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश काय? 
- स्वनाथ फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून, तिची स्थापन जून २0१९ मध्ये झाली. अनाथ मुलांना स्वनाथ बनवून त्यांना हक्काची कुटूंब मिळवून देणे, त्यांचे अधिकार, त्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी स्वनाथने कार्य हाती घेतले आहे. समाजाचे पाठबळ मिळाले तर अनाथ स्वनाथ बनतील.  


अनाथ मुलांचे पुर्नवसन कसे करणार?  
- देशात, राज्यात अनेक मुले अनाथ आहेत. अशा प्रत्येक अनाथ मुला-मुलींना कुटूंब मिळवून द्यावे. त्यांना कुटूंब मिळाले तर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक विकास होईल. अनाथ हे अनाथ न राहता, स्वनाथ बनावे. स्वनाथ म्हणजे, मी माझाच नाथ ही आमची संकल्पना आहे. 


अनाथ मुलांना कुटूंब मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत.? 
- गणेशोत्सवामध्ये गणपतीला घरी आणतो. दहा दिवस मनोभावे पुजतो. त्याऐवजी अनाथ मुलाला घरी आणले, त्याला न्हाऊमाखू घातले तर गणेशाच्या पूजनाचे पुण्य लाभेल. अशा पद्धतीने आम्ही येत्या गणेशोत्सवामध्ये १00 अनाथ मुलांना काही कुटूंबांच्या घरी पाठविणार आहोत. त्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे. यातूनच कुटूंबांची इच्छा मुलांना दत्तक घेण्याची झाल्यास, त्यांना प्रवृत्त करणे, अकोल्यात गायत्री शिशूगृह, उत्कृर्ष अनाथालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

 
- अनाथालये असताना, कुटूंब पालकत्व कसे स्विकारणार ? 
सध्या सामाजिक संस्थांचे बाजारीकरण झाले आहे. अनाथालय हे अनाथ मुलांसाठी तात्पुरती व्यवस्था आहेत. यातून त्यांचा शारिरीक, भावनिक विकास होत नाही. अनेकदा येथील मुले वाममार्गाला लागली आहेत. त्यांना अत्याचाराला बळी पडली आहेत. अनाथमुक्त आणि अनाथालयमुक्त भारतासाठी कुटूंब व्यवस्थेत अनाथ मुले गेली पाहिजे. त्यांचे पालकत्व स्विकारण्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे.  यासाठी स्वनाथ फाऊंडेशन काम करीत आहेत. त्याला समाजाचे पाठबळ सुद्धा मिळत आहे. अनाथ मुले ही स्वनाथ बनावी. हेच आमचे ध्येय आहे. 

Web Title: Efforts to make orphanage free India! - Shreya Bhartiy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.