संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! - एकनाथ डवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 19:28 IST2021-01-23T19:28:39+5:302021-01-23T19:28:56+5:30
Eknath Dowle News संत्र्याच्या निवडक जातींचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! - एकनाथ डवले
अकोला: विदर्भातील संत्रा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यासाठी तसेच नागपूरच्या संत्र्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी संत्र्याच्या निवडक जातींचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित संत्रा प्रजाती प्रकल्प उभारण्यासंदर्भात विशेष सभेच्या प्रसंगी ते बोलत होते. विदर्भात
संत्रा पिकाखाली नोंद घेण्याजोगे क्षेत्र असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाद्वारे अपेक्षित वाण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या संशोधनात्मक बाबींचे कार्य समाधानकारक असल्याचे मत डवले यांनी यावेळी व्यक्त केले. भविष्यात अशा वाणांची तथा प्रक्रिया प्रकल्पाची गरज अधोरेखित केली. विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालय सभागृहात शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता (कृषि) डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे तथा विभाग प्रमुख, फळशास्त्र विभाग डॉ. शशांक भराड यांच्या सह विभागीय सह संचालक (कृषि), अमरावती विभाग तोटावर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नलावडे, महाबीजचे प्रफुल्ल लहाने व अजय कुचे, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. डॉ. खर्चे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भराड यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. कृषी सचिवांनी प्रकल्पाचा आढावा घेतला आणि पुढील कार्यक्रम राबविण्याविषयी मार्गदर्शन केले. त्याअनुषंगाने अकोला येथे फळशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि फळ संशोधन केंद्र, काटोल येथे संपूर्ण निवडक चाचणी झालेल्या वाणांची अभिवृद्धी करून लागवड करण्यात येईल. जेणेकरून संत्रा वाण विकास करणे सोपे होईल व उत्कृष्टवाणाची निर्मिती करण्यात येईल. बैठकीनंतर डवले यांनी प्रक्षेत्राला भेट दिली. याप्रसंगी डॉ. दिनेश पैठणकर तथा डॉ. योगेश इंगळे यांनी प्रक्षेत्रावरील कार्याची माहिती दिली. त्यानंतर फळशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर इंडोइस्राइल तंत्रज्ञान संत्रा लागवड प्रकल्पाची पाहणी केली. येथे डॉ. उज्वल राऊत, डॉ. संतोष घोलप यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी आभार मानले.