शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: November 19, 2014 01:56 IST2014-11-19T01:56:56+5:302014-11-19T01:56:56+5:30
लोकमत संवाद; आ. बळीराम सिरस्कार यांचे सुतोवाच .

शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न
अकोला : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत होऊन काम करणार्या भारिप-बहुजन महासंघातर्फे विधानसभा निवडणूक लढविताना सलग दुसर्यांदा विजयी झालेले आमदार बळीराम सिरस्कार येणार्या काळात वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यासोबतच सिंचन क्षमता वाढविणे आणि खारपाणपट्टय़ातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. बेरोजगारांची प्रश्न गंभीर स्वरुप घेत असल्याने शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मतदारसंघात प्रयत्न करणार असल्याचे मत आ. सिरस्कार यांनी मंगळवारी लोकमतच्या संवाद कार्यक्रमात संपादकीय विभागातील सहका-यांसोबत चर्चा कताना व्यक्त केले.
प्रश्न : लेमन सिटी म्हणून अकोल्याची ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी बाळापूर मतदारसंघाचा वाटा मोठा आहे. अलिकडच्या काळात मात्र लिंबू उत्पादनात घट होताना दिसत आहे. ते वाढविण्यासाठी काही उपाययोजना आहेत काय?
आ. सिरस्कार: बाळापूर मतदासंघातील वाडेगाव परिसरात कांदा आणि लिंबू उत्पादन मोठय़ाप्रमाणावर होते. या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभे झाले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय सामुहिक शेतीचा प्रयोग राबविल्यास कांदा आणि लिंबू उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या मालासाठी जागेवरच चांगल्या दर मिळू शकतील.
बाळापूर मतदारसंघातील, विशेषत: बाळापूर शहरातीलच रस्ते व पुलांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?
आ. सिरस्कार: बाळापूर शहरातील रस्त्यांसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मोहरम उत्सवामुळे रस्त्याचे काम बंद होते. ते पुन्हा सुरू होत आहे. पुल, पुलांवरील कठड्यांसाठी पाठपुरावा सुरू असून काही कामांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुलाच्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून निधी मंजुर झाला आहे. निधी मिळातच काम सुरू होईल. रस्त्यांसोबतच स्मशान भूमीच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे.
प्रश्न : हैदराबाद-इंदोर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पातूर तालुक्यात रखडले आहे. ते सुरू करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केलेत?
आ. सिरस्कार: हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नादेंड विभागातील काम सुरू आहे. जिल्ह्यातून जाणार्या मार्गाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू.
प्रश्न :ऐतिहासिक वारसा लाभलेले दोन तालुके मतदारसंघात आहेत. त्यादृष्टीने पर्यटन वाढीकरिता काय प्रयत्न करणार आहे?
आ. सिरस्कार: मतदारसंघातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे. बाळापूरच्या किल्लयाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न झालेत. पर्यटन वाढीसाठी बाळापूर आणि पातूरमध्ये बराच वाव आहे. त्यासाठी काही प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठवू.
प्रश्न - वाडेगाव परिसरातील लिंबाने भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला आहे; परंतु लिंबावर आधारित प्रकिया उद्योग व लिंबाचे क्षेत्र घटले आहे. यासंबधी आपण काय करणार?
आ. सिरस्कार: हा अत्यंत जिव्हाळ्य़ाचा प्रश्न असून, या भागातील लिंबू उत्पादनाचे क्षेत्र वाढलेच पाहिजे आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा झालाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. या प्रश्नावर लक्ष देणार आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे.
प्रश्न :- भारिप-बमसंला सर्वच समाजाची मतं का मिळत नाहीत?
आ. सिरस्कार :- प्रत्येक समाजघटकाला निवडणुकीत संधी देणे हे भारिप-बमसंचे धोरण आहे. भारिप-बमसंला इतर समाजातील मतं कमी प्रमाणात मिळतात. इतर समाजातील जास्त मतं न मिळण्यासाठी अनेक कारणं आहेत.
प्रश्न :- विकासकामांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार काय ?
आ. शिरस्कार :- दिंडी मार्गातील पथदिवे फोडले जातात. ही संपत्ती आपली स्वत:ची आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. लोकसहभागातूनच देखभाल शक्य आहे.