मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:06 IST2019-11-10T13:06:25+5:302019-11-10T13:06:39+5:30

मनोविकृती विभागात ईईजी मशीन असूनही तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने ईईजी सेवा बंद पडली आहे.

EEG services in psychiatric departments closed! | मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद!

मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद!

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ईईजी मशीन असूनही तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने ईईजी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे मनोविकृती विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतात. कधी औषध नसते, तर कधी मनुष्यबळाचा अभाव, यामुळे नेहमीच सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा प्रभावित होते. अशातच मनोरुग्ण विभागातही मनुष्यबळाअभावी रुग्णसेवा प्रभावित होत आहे. मनोरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी येथे २००७ पूर्वीच नवीन ईईजी मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु या मशीनचा नियमित वापर न झाल्याने ती धूळ खात पडून होती. त्यामुळे मानसिक आजार, रुग्णांची चिडचीड, डोक्याला मार लागणे, बेशुद्ध असणे अशा परिस्थितीतील रुग्णांची तपासणी प्रभावित झाली आहे. शासन रुग्णांसाठी कोट्यवधीचा खर्च करूनही रुग्णांना सुविधांचा लाभ मिळत नाही; मात्र डॉक्टरांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नाही. ईईजी सेवा बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. ही सेवा त्वरित सुरू करण्यात यावी, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराअध्यक्ष आशीष सावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु रुग्णालय प्रशासनाकडे तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही सेवा ठप्प पडल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

मनोविकृती विभागातील ईईजी मशीन बंद आहे. विभागात मनुष्यबळच कमी असल्याने मशीन दुरुस्त केली, तरी कशी वापरावी हा प्रश्न आहे. मशीन हाताळण्यासाठी न्यूरॉलॉजिस्टची गरज आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता

Web Title: EEG services in psychiatric departments closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.