टॉवर ते रतनलाल प्लॉट रस्त्याला ग्रहण

By Admin | Updated: May 27, 2017 00:44 IST2017-05-27T00:44:14+5:302017-05-27T00:44:14+5:30

एसबीआयची हायकोर्टात धाव; रस्ता रुंदीकरणासाठी मनपाला हवी जागा

Eclipse on the tower to Ratanlal plot road | टॉवर ते रतनलाल प्लॉट रस्त्याला ग्रहण

टॉवर ते रतनलाल प्लॉट रस्त्याला ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून प्रशस्त रस्त्यांचे निर्माण कार्य महापालिकेने सुरू केले. तीन प्रमुख सिमेंट रस्त्यांचे काम आटोपल्यानंतर मनपाने टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकाकडे मोर्चा वळवला असता, रस्ता रुंदीकरणासंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाने नागपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ठप्प पडले आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रशस्त रस्ते, दुभाजकांमध्ये एलईडी पथदिवे लावल्या जात आहेत. मनपानेही सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटची करण्याचा निर्णय घेतला आहे. सिव्हिल लाइन रोड, माळीपुरा ते मोहता मिल रोड, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आदी तीन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मनपाने त्यांचा मोर्चा टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक रस्त्याकडे वळवला. रस्त्याच्या मधोमध असणारा दर्गा रुंदीकरणाच्या आड येत असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन दर्गा हटवला होता. दर्गा हटवल्यानंतर मनपाने रतनलाल प्लॉट चौक ते हनुमान मंदिरापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ३३० मीटर अंतराचा रस्ता पूर्ण केल्यानंतर उर्वरित रस्ता रुंद करण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आवारभिंतीची जागा अपेक्षित आहे. ही जागा मिळणार, असे गृहीत धरून मनपाने सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. यावर बँकेच्या वतीने मात्र नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे टॉवर चौक ते हॉटेल आशिषपर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे.

‘टीडीआर’ नाही, पैसे हवेत!
मनपाला रस्ता रुंदीकरणासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाची जागा हवी आहे. जागेच्या बदल्यात महापालिका ‘टीडीआर’ देण्यास तयार असली, तरी बँकेला रोख रक्कम हवी असल्याची माहिती आहे. ही रक्कम सुमारे ११ ते १२ कोटींच्या आसपास जाणार असल्याने मनपासमोर पेच निर्माण झाला आहे.

जून महिन्यात रस्त्याला सुरुवात
प्रखर उन्हामुळे सिमेंट रस्त्याला भेगा पडतात. त्यावर कितीही पाण्याचा मारा केला तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. ही बाब लक्षात घेता या रस्त्याच्या कामाला जून महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Eclipse on the tower to Ratanlal plot road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.