‘ई-पॉस’ मशीन बंद; धान्य वाटपात अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:15 PM2020-03-14T12:15:05+5:302020-03-14T12:15:14+5:30

धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

E-POS machine turned off; Disturbance of grain allocation! | ‘ई-पॉस’ मशीन बंद; धान्य वाटपात अडथळा!

‘ई-पॉस’ मशीन बंद; धान्य वाटपात अडथळा!

googlenewsNext

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन गत सात दिवसांपासून बंद पडल्याने, धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार २६ दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यात आल्या असून, बायोमेट्रिक पद्धतीने ‘ई-पॉस’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे; परंतु सर्व्हर डाउन असल्याने, गत ७ मार्चपासून जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन बंद पडल्याने, धान्याचे वितरण करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील गहू, तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे.
त्यानुषंगाने रास्त भाव दुकानांमधील बंद पडलेल्या ई-पॉस मशीन केव्हा पूर्ववत सुरू होणार आणि रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करण्याची वेळ शिधापत्रिकाधारकांवर आली आहे.


...तर दुकाने बंद ठेवणार
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशीन ७ मार्चपासून बंद पडल्याने, धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. धान्य वेळेवर मिळत नसल्याने, शिधापत्रिकाधारकांच्या संतापाचा सामना रास्त भाव दुकानदारांना करावा लागत आहे. त्यामुळे ई-पॉस मशीन पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा रास्त भाव दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे व महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी १२ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सर्व्हर डाउन असल्याने, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण होत असल्याने, यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे.
-बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: E-POS machine turned off; Disturbance of grain allocation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला