दप्तराच्या ओझ्यामुळे ६४ टक्के चिमुकले त्रस्त!
By Admin | Updated: March 26, 2016 02:15 IST2016-03-26T02:15:03+5:302016-03-26T02:15:03+5:30
उपाययोजना करण्याची गरज; बुलडाणा ‘आयएमए’च्या पदाधिका-यांचा पुढाकार.

दप्तराच्या ओझ्यामुळे ६४ टक्के चिमुकले त्रस्त!
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
तुमचे पाल्य शाळेत नेत असलेल्या दप्तराच्या ओझ्याकडे डोळसपणे पाहण्याची व त्यावर उपाय काढण्याची वेळ आली आहे. दप्तराच्या ओझ्यामुळे पाल्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, ६४ टक्के चिमुकले त्रस्त झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे यासारखे विकार होऊ शकतात. शासनाने या विषयावर चर्चा करण्यासाठी समिती नेमून काही उपाययोजना सुचविल्या होत्या. परंतु त्यावर पालक व शाळा दोघांकडूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. बुलडाणा येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. अविनाश सोळंकी यांनी या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन 'लिटिल एंजल्स' हा उपक्रम सुरू केला. त्या अन्वये त्यांनी आयएमएचे सदस्य डॉ. गजानन व्यवहारे, डॉ. बिपीन शेंडे, डॉ. अशोक भवटे, डॉ. संदीप साबळे, डॉ. मारूती चाटे, डॉ. प्रतिमा व्यवहारे, डॉ. प्रमिला सोळंकी, डॉ. रवींद्र सोळंकी, डॉ. अनिल साळोक, डॉ. पंकज हरकुट, डॉ. विनोद जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांचेबरोबर पालकांशी देखील संवाद साधला. निदर्शनाअंती त्यांना असे दिसून आले, की दप्तराचे ओझे व दुष्परिणाम कमी करण्यासाठी शाळा व पालक दोघांचाही बरोबरीचा सहभाग असणे आवश्यक आहे. याबाबत पर्यवेक्षीय अधिकार्यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन दप्तराचे वजन करून ते कमी असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे या भविष्याचा पाया आतापासूनच मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाच्या प्रत्येक सदस्याकडून सहयोग हा असायलाच हवा. केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा चालढकल केल्यास भविष्यात मुलांना गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन आयएमएचे पदाधिकार्यांनी केले आहे.
'आयएमए'चा 'लिटिल एंजल्स' उपक्रम
बुलडाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ह्यलिटिल एंजल्सह्ण उपक्रम सुरू केला असून, एका सर्व्हेनुसार दप्तराच्या ओझ्यामुळे ६४ टक्के चिमुकले त्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे असोसिएशनने डॉ.अविनाथ सोळंकी यांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक तसेच पाल्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय ह्यलिटिल एंजल्सह्ण या उपक्रमांतर्गत लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.