मालगाडीचा डबा घसरला!
By Admin | Updated: July 8, 2017 02:21 IST2017-07-08T02:21:23+5:302017-07-08T02:21:23+5:30
कुरुम रेल्वेस्थानकाजवळील घटना; दोन तास वाहतूक प्रभावित

मालगाडीचा डबा घसरला!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला/कुरुम : मध्य रेल्वे मार्गावर मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या कुरुम रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७.४० वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. या घटनेमुळे डाउन लाइनवरील वाहतूक दोन तास प्रभावित झाली होती.
कोळशाच्या रिकाम्या वॅगन्स घेऊन भुसावळवरून चंद्रपूरकडे जात असलेली एक मालगाडी कुरुम रेल्वेस्थानकाजवळील लुप लाइनवर जात असताना ही घटना घडली. लुप लाइनवर जाताना इंजीनपासून पाचवी वॅगन रुळावरून खाली घसरल्याने डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. यानंतर सहाव्या वॅगनपासून ही गाडी याच मालगाडीच्या इंजीनद्वारे विलग करण्यात आली. दोन तासांनंतर दुर्घटनाग्रस्त वॅगन जागेवर सोडून कुरुम रेल्वेस्थानक प्रबंधकांनी मालगाडीला पुढे रवाना केले. नवजीवन एक्स्प्रेस दोन तास अकोला रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आली, तर सुरत पॅसेंजरला गायगाव रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आले होते. तसेच काचीकुडा-नरखेड ही गाडी माना येथे थांबविण्यात आली होती. ही घटना जर अप लाईनवर घडली असती तर अकोला मार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असते अशी माहिती अकोला रेल्वे स्थानक प्रबंधकांनी ‘लोकमत’ला दिली.