विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली राजराजेश्वर नगरी
By Admin | Updated: July 10, 2014 01:27 IST2014-07-10T01:26:16+5:302014-07-10T01:27:52+5:30
अकोल्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली राजराजेश्वर नगरी
अकोला : दरवर्षी येणार्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं महत्त्व न्यारंच. आषाढी एकादशीची चाहुल लागताच विठ्ठल भक्ताच्या मनात आनंद तरंग वाहू लागतात. ह्ययाची डोळा याची देहीह्ण कधी एकदा पंढरीच्या रायाचं दर्शन घेतो, अशी अवस्था भक्तांची होऊन जाते. बुधवारी राजराजेश्वर नगरीतील विविध भागात असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये मोठय़ा उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
३00 वर्ष पुरातन असलेल्या जुने शहरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे ४ वाजता आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. महा पूजेनंतर आरती झाली. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या गर्दीमुळे दिवसभर मंदिराचा परिसर फुलून गेला होता. परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पूजासाहित्य, खेळणी आणि गृहोपयोगी साहित्यांची दुकाने परिसरात व्यावसायिकांनी थाटली होती. फराळी खाद्यपदार्थांचेदेखील स्टॉल परिसरात लावण्यात आले होते. आषाढीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी होती. रात्री ९.३0 ते ११.३0 च्या दरम्यान डॉ. अभय कुळकर्णी यांचे कीर्तन पार पडले. कीर्तनाप्रसंगी अनुजा देश पांडे हिने तबल्यावर साथ दिली.