तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: January 7, 2015 01:28 IST2015-01-07T01:28:56+5:302015-01-07T01:28:56+5:30
एटीएमही पडले बंद, संप मागे घेतल्याने खातेधारकांना दिलासा.

तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार ठप्प
अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे लीजलाइनवर इंटरनेटद्वारे कनेक्ट राहणार्या जिल्हय़ातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार मंगळवारी दिवसभर ठप्प पडले. सोमवार, ५ जानेवारीपासून उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका राष्ट्रीयीकृत बँकांसह डाक खात्यालादेखील बसल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडले. एटीएमसुद्धा बंद पडल्याने खातेधारकांची चांगलीच अडचण झाली. शनिवारी ह्यहाफ डेह्ण, रविवारी साप्ताहिक सुटी, तर सोमवार-मंगळवारी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीनंतर बुधवारी नियोजित संपाचे सावट बँकांच्या व्यवहारावर होते; मात्र नियोजित संप मागे घेण्यात आल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. बीएसएनएलच्या लीजलाइनवर मिळणार्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार चालतात. नागपूर येथील बीएसएनलच्या कोर-रूटरच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीयीकृत बँक इंटरनेटच्या लीजलाइन देण्यात आल्या आहेत. बँकांमार्फत कोअर-रूटरचा वापर अधिक होत असल्याने सोमवारी दुपारी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मंगळवारीदेखील हा बिघाड कायम असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प होते.