पावसाने पिकांना संजीवनी
By Admin | Updated: November 12, 2014 01:06 IST2014-11-12T01:06:47+5:302014-11-12T01:06:47+5:30
अकोल्यात २६ मिमी पावसाची नोंद : ज्वारी व बागायती पिकांचे नुकसान.

पावसाने पिकांना संजीवनी
अकोला: परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात पिके येतील की नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात पातूर, बाश्रीटाकळी आणि बाळापूर तालुक्यात काही ठिकाणी सरी बसल्यात. मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पाऊस झाला. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती तसेच थंडीही कमी झाली होती. जिल्ह्यात विविध ठिकाणी २0 ते ३0 मिमीच्या दरम्यान झालेल्या पावसाने रब्बी हंगामात पिकांना फायदा होणार आहे. पातूरमध्ये दुपारी १२ वाजतानंतर काळ्या ढगांनी आकाश व्यापले. त्यानंतर दुपारी १ वाजतानंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहिले. अचानकपणे आलेल्या या पावसाने काही प्रमाणात तूर व कपाशीच्या पिकाला लाभ होण्याची शक्यता आहे. वादळी हवेमुळे संकरित ज्वारी, ओलिताच्या कपाशीची झाडे जमिनीवर झुकली.