औषधोपचाराअभावी अल्पभूधारक शेतक-याचा मृत्यू!
By Admin | Updated: April 15, 2016 02:22 IST2016-04-15T02:22:07+5:302016-04-15T02:22:07+5:30
आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे अल्पभूधारक शेतक-याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.

औषधोपचाराअभावी अल्पभूधारक शेतक-याचा मृत्यू!
शिर्ला (पातूर, अकोला): घरी अठराविश्वे दारिद्रय़.. चार एकर शेतीच्या तुकड्याशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही..त्यात दुष्काळ..दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत.. अशा बिकट परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने खाटेला खिळवून ठेवले. आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे खचलेल्या एका अल्पभूधारक शेतकर्याचा गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पातुर तालुक्यातील शिर्ला येथील विनायकराव उत्तमराव अंधारे ( ६४) यांच्याकडे चार एकर शेती होती. यातूनच ते आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचे शरिर लुळे पडले . सुरूवातीला त्यांनी जुजबी औषधोपचार घेतला; परंतु परिस्थितीअभावी पुढचा महागडा औषधोपचार शक्य न झाल्यामुळे विनायकराव कायमचे अंथरुणाला खिळले. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळल्यामुळे आधीच अठराविश्वे दारिद्रय़ असलेल्या अंधारे कुटुंबावर डोंगरच कोसळला. विनायकराव यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि सून, तसेच चार वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दगावलेल्या मोठय़ा मुलाची मुलगी एवढे सदस्य आहेत. मुलगा मिळेल ते काम करून सर्वांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत असताना विनायकराव औषधोपचार घेऊ शकले नाही. यंदा दुष्काळामुळे नापिकी झाली. गत चार वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. या हलाखीच्या परिस्थितीत गुरुवारी विनायकरावांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अर्धांगवायूने अंथरूणाला खिळलेल्या विनायकरावांना वेळीच उपचार मिळाला असता, तर ते वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया गावकर्यांनी व्यक्त केल्या आहेत. रुढी, परंपरेला दिली तिलांजली रुढी, परंपरेनुसार निधनानंतर धार्मिक विधी पार पाडले जातात. या खर्चिक प्रकाराला फाटा देण्याचा निर्णय अंधारे कुटुंबियांनी घेतला. विनायकराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याप्रसंगी खर्चिक रुढी परंपरांना तिलांजली देण्याची घोषणा दिलीप मोतीराम अंधारे यांनी सर्व नातेवाईकांसमोर केली. त्याला समाजबांधवांनी सर्मथन दिले.