समन्वयाअभावी पोलीस-नागरिकांमध्ये दरी!
By Admin | Updated: April 30, 2015 01:51 IST2015-04-30T01:51:55+5:302015-04-30T01:51:55+5:30
संवाद वाढविण्याची गरज, विश्वास निर्माण करण्यासाठी अधिका-यांनी घ्यावा पुढाकार, परिचर्चेतील सूर.

समन्वयाअभावी पोलीस-नागरिकांमध्ये दरी!
अकोला- कापशी प्रकरणात निष्पाप लोकांवर पोलिसांनी केलेले अत्याचार आणि त्यापूर्वी पोलिसांवर झालेला हल्ला, या दोन्ही घटना पोलीस आणि जनतेतील दरी किती रुंदावली आहे, हे स्पष्ट करणार्या होत्या. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून काम केले पाहिजे, असा शासनाचा प्रयत्न असतो, तर नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे. अलीकडच्या काळात मात्र समन्वयाअभावी दोन्ही बाजूने टोकाची भूमिका घेतली जात असल्याचे आढळून येते. पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने नियमित संवाद होणे गरजेचे असून, पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली दरी कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर लोकमतने बुधवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला.
अकोला लोकमत शहर कार्यालयात बुधवारी दुपारी ह्यपोलीस नागरिकांचे मित्र का बनू शकले नाहीतह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत नवृत्त साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, बालकल्याण समिती सदस्य अँड. संगीता भाकरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, सचिन गाढेकर, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, परवानाधारक ऑटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शर्मा, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अजय वाघमारे, उपाध्यक्ष अँड. प्रवीण तायडे आदी सहभागी झाले होते. या मान्यवरांनी अकोला शहरातील पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत पोलीस आणि नागरिकांमधील दरी वाढण्यास वरिष्ठ अधिकार्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सांगितले. कधीकाळी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील रस्त्यांवर फिरताना आढळत होते. चौकाचौकांतून फिरताना दिसायचे. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांमध्ये कर्तव्याबाबत शिस्त होती. गुन्हेगारांवर, टवाळखोरांवर वचक राहत होता. आता वरिष्ठ अधिकार्यांचा चेहरासुद्धा सर्वसामान्यांना बघावयास मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असून, पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे. हा विश्वास परत मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटला. त्याचवेळी पोलीस कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे, तोही मनुष्यच आहे. त्यालाही काही र्मयादा आहेत. त्यामुळे समाजाने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांशी संवाद वाढविणे हा एक उपाय असल्याचे मान्यवरांनी सांगितले.