डीटीएडच्या हजर विद्यार्थ्यांना दाखविले गैरहजर
By Admin | Updated: November 12, 2014 01:03 IST2014-11-12T01:03:09+5:302014-11-12T01:03:09+5:30
डाएट प्राचार्यांनी खोटा अहवाल पाठविल्याचा आरोप.

डीटीएडच्या हजर विद्यार्थ्यांना दाखविले गैरहजर
अकोला : जिल्ह्यातील तीन डीटीएड विद्यालयांतील ५३ विद्यार्थ्यांना हजर असूनदेखील गैरहजर दाखविण्याचा पराक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्यांनी केला असल्याची तक्रार अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांंनी केली आहे. शिक्षण संचालकांकडे खोटा अहवाल पाठविल्याचादेखील आरोप या विद्यार्थ्यांचा आहे. शाळांप्रमाणेच डीटीएड विद्यालयातदेखील पटपडताळणी केली जाते. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व त्यांचे सहकारी पटपडताळणी करतात. त्यानुसार डाएटचे प्राचार्य जालंधर सावंत व त्यांची चमू ८ ऑक्टोबर रोजी खडकी येथील दत्तगुरू अध्यापक विद्यालयात गेली. इथे विद्यार्थी असतानादेखील प्राचार्यांंनी विद्यार्थ्यांंची हजेरी स्वत:च्या कागदावर घेतली नाही व त्या दिवशी विद्यार्थी गैरहजर असल्याचा अहवाल तयार केला, असा आरोप स्मिता ढोकणे, सुधीर बाभुळे, अश्विनी तळसे, मोनिका डहाके, नीता राजूरकर, गौरी वाघमारे, माधुरी जंजाळ, सायली जंजाळ, वैशाली तायडे, ज्योत्स्ना नाराजे, शीतल सोनोने, शामल चव्हाण, संगीता मुरलीधर, सुषमा वानखडे, संगीता उमाळे, कांचन लोंढे या विद्यार्थ्यांनी केला आहे. आपल्यावरील अन्यायासंदर्भात डाएट प्राचार्यांना भेटायला गेले असता, ते गैरहजर होते. त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली नाही; मात्र गैरहजेरीचा खोटा अहवाल तयार करून शिक्षण संचालकांकडे पाठविला असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अन्याय करणार्यांनी खुलासा करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच प्राचार्य जालंधर सावंत यांनी आम्ही शासकीय नियमानुसार कारवाई केली असल्याचे स्पष्ट केले.