सात वर्षांच्या मुलीला दिले जनावराचे औषध!
By Admin | Updated: July 27, 2016 02:08 IST2016-07-27T02:08:54+5:302016-07-27T02:08:54+5:30
भांडपुरा चौकातील मेडिकल चालकाचा प्रताप; मुलगी खासगी रुग्णालयात दाखल.

सात वर्षांच्या मुलीला दिले जनावराचे औषध!
सचिन राऊत /अकोला
बाळापूर रोडवरील रहिवासी असलेल्या एका सात वर्षाच्या चिमुकलीला भांडपुरा चौकात असलेल्या एका मेडिकल संचालकाने खोकल्याचे औषध म्हणून चक्क जनावराचे औषध दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री घडला. सदर औषध घेतल्यानंतर चिमुकलीची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे तिला मोठय़ा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण मेडिकल चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रकरण निस्तारण्यासाठी सर्वच प्रयत्न केल्याची माहिती आहे.
वेदश्री दत्ता जोशी (वय ७) या मुलीला खोकला आणि सर्दी असल्याने तिला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टरांनी तिला ह्यकासनीह्ण नावाचे आयुर्वेदिक औषध चिठ्ठीवर लिहून दिले. वेदश्रीच्या आईने सदर चिठ्ठीवरून भांडपुरा चौकात असलेल्या रिना मेडिकल स्टोअर्समधून हे औषध खरेदी केले. त्यानंतर या बाटलीमधील दोन चमचे औषध वेदश्रीला दिल्यानंतर तिला उलट्या सुरू झाल्या तसेच प्रकृती गंभीर झाली. वेदश्रीची प्रकृती बिघडली असतानाच तिचे वडील वाशिमला होते. त्यामुळे त्यांनी पत्नीकडून सदर औषधाचे एक छायाचित्र व्हॉट्स अँपच्या माध्यमातून मागवून घेतले. त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामकाजाचा अनुभव असल्याने सदर औषध हे जनावरांचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वेदश्रीला तातडीने डॉ. विजय घोगरे यांना दाखविण्यात आले; मात्र त्यांनी काहीही होणार नसल्याचा धीर दिला. त्यानंतरही सोमवारी उशिरा रात्री वेदश्रीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिच्या वडिलांनी तिला मोठय़ा खासगी मुलांच्या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासण्या केल्यानंतर वेदश्रीला जनावरांसाठी असलेले ह्यमेरीक्लीनह्ण हे औषध दिल्याचे स्पष्ट झाले. या औषधामुळे तिच्या पोटात विष निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीत सांगितले. लगेच नाकामध्ये नळी टाकून तिच्या शरीरातील विष रात्री काढण्यात आले. मंगळवारी सायंकाळी वेदश्रीची प्रकृती धोक्याबाहेर होती.
दरम्यान हा प्रकार रिना मेडिकलच्या चालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मोठय़ा हुशारीने त्यांच्याकडील औषधांची बाटली ताब्यात घेतली; मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने रात्री २ वाजेपर्यंत रुग्णालयाच्या बाजूलाच ठाण मांडले होते. मंगळवारी दुपारनंतर प्रकृती ठीक झाल्याचे कळताच मेडिकल संचालकाने रुग्णालय परिसरातून काढता पाय घेतला. वेदङ्म्रीच्या वडिलांनी वेळेत योग्य ती काळजी घेतल्याने आणि डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने तिचे प्राण वाचले.
फार्मासिस्ट नसल्याने घोळ
शहरातील बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याचे या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. हे औषध देताना तज्ज्ञ फार्मासिस्ट या औषधी दुकानात हजर नव्हता त्यामुळे सदर चिमुकलीला जनावरांचे औषध देण्यात आले. मेडिकल चालकाच्या या छोट्याशा चुकीमुळे एका मुलीचा जिवासोबत खेळण्याचा प्रयत्न झाला. याच कारणावरून आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी शहरातील औषधी दुकानांच्या तपासण्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मेडिकल संचालकानेच दिली कबुली
वेदश्री जोशी हिच्यावर सोमवारी रात्री उशिरा डॉ. सुभाष भागडे यांनी तातडीने उपचार केल्याने ती सुखरूप आहे. त्यानंतर मेडिकल ंचालक बाप-लेकांनी डॉ. सुभाष भागडे व वेदश्रीच्या आई-वडिलांची भेट घेऊन चुकीने औषध दिल्याची कबुली डॉक्टरांसमोर दिली; मात्र या मेडिकल संचालकाच्या अशा निष्काळजीमुळे वेदश्रीचा जीव धोक्यात आला होता. वेदश्रीचे वडील वैद्यकीय क्षेत्रात काम करून असल्यामुळे त्यांनी तातडीने योग्य ते उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला.