ग्रामीण भागात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषध विक्री
By Admin | Updated: September 1, 2014 21:41 IST2014-09-01T21:41:20+5:302014-09-01T21:41:20+5:30
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : औषध दुकानदारांना अन्न व औषध विभागामधील अधिकार्यांचे पाठबळ

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषध विक्री
अकोला : 'अँन्टी बायोटिक्स, आणि 'पेन किलर' औषधांमुळे मानवाच्या शरीरावर घातक परिणाम होत असून, मानवाची प्रतिकारशक्ती या औषधांमुळे कमी होत आहे. त्यामुळे घातक असलेल्या ४६ औषधांसाठी 'शेड्युल्ड एच १' तयार करून या औषधांची विक्री एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करण्याचे आदेश आहेत; मात्र ग्रामिण भागातील औषधी दुकानदारांनी हे आदेश पायदळी तुडवित डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री सुरूकेली आहे. या औषध दुकानदारांवर कारवाई करण्यास कानाडोळा करण्यात येत असून, त्यांना अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्यांचे पाठबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
'अँन्टी बायोटिक्स' आणि 'पेन किलर' या औषधांची विक्री करण्यासाठी 'शेड्युल्ड एच १' तयार करण्यात आले आहे. या शेड्युल्डमध्ये अत्यंत धोकादायक आणि ज्या औषधांचा गैरवापर केला जाऊ शकतो, अशा ४६ औषधांची विक्री एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. यासोबतच ही औषधं ज्या रुग्णांना दिली त्यांचे नाव, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, वय व ब्लड प्रेशरच्या माहितीचे रेकॉर्ड ठेवणे औषधी दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील औषधी दुकानदार चिठ्ठी नसतानाही या औषधांची विक्री करीत असून, या औषधी विनादेयकानेच खरेदी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औषध दुकानदारांनी ही औषधं विक्री करताना डॉक्टरांची चिठ्ठी घेणे, औषधांचे देयक देणे, रुग्णाचे नाव पत्ता लिहून ठेवणे आवश्यक आहे. मात्र या औषधी विनादेयकाने घेण्यात येत असल्याने औषधी दुकानदारांना रेकॉर्ड ठेवण्याचा संबंधच राहिला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रतिकारशक्ती कमी करून ह्यलिव्हरह्ण निकामी करणार्या या औषधांची खुलेआम विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन विभागातील ग्रामीण भागाचे कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी मात्र मूग गिळून बसले
आहेत.
** तपासणीच्या नावाखाली कारवाईचा देखावा
ग्रामीण भागातील औषध दुकानांची तपासणी करण्यात येते, मात्र आजपर्यंत शेड्युल्ड एच-१ च्या पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या तपासणीच्या नावाखाली कारवाईचा देखावा अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या औषधी विनादेयकाने खरेदी करून त्याची विक्रीही अशाच प्रकारे करण्यात येत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडेही अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे.