दुबार पेरणीचे संकट!

By Admin | Updated: June 26, 2017 09:36 IST2017-06-26T09:36:42+5:302017-06-26T09:36:42+5:30

शेतकरी हवालदिल; बियाणे बाजारातील गर्दी ओसरली.

Drought sowing crisis! | दुबार पेरणीचे संकट!

दुबार पेरणीचे संकट!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वऱ्हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाला असून, शेतकऱ्यांनी अद्याप पूर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठांची खरेदी केलेली नाही.
अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत जवळपास ५० ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्यात १० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत.
पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अर्ध्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, अक ोला जिल्ह्यातही ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १० टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातही ५० टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.

Web Title: Drought sowing crisis!