दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार?
By Admin | Updated: February 7, 2015 02:37 IST2015-02-07T02:13:49+5:302015-02-07T02:37:09+5:30
१२ हजारांवर अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा.
_ns.jpg)
दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार?
संतोष येलकर / अकोला:
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला असला तरी गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची मदत अद्याप मिळाली नाही. अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकरी करीत आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांतील खरीप पिकांना या अतवृष्टीचा तडाखा बसला होता. या चार तालुक्यांमधील २३७ गावांमध्ये १२ हजार १६६ शेतकर्यांचे ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांच्या आत नुकसान झाले. या पीक नुकसानीचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, कृषी साहाय्यक व ग्रामसेवकांकडून करण्यात आले. अतवृष्टीमुळे झालेल्या या पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत ७ नोव्हेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता.
दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत पहिल्या टप्प्यात गत जानेवारीमध्ये ७५ कोटी ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. तसेच ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला; मात्र सहा महिन्यांपूर्वी अतवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानभरपाईची मदत अद्यापही शासनाकडून प्राप्त झाली नाही. ही मदत शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकर्यांकडून केली जात आहे.
दरम्यान अतवृष्टीमुळे गत जुलैमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांत झालेल्या पीक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून मदतनिधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगीतले.