दुष्काळ संपला; पण शेतकरी आत्महत्या थांबेनात!
By Admin | Updated: August 25, 2016 02:04 IST2016-08-25T02:04:33+5:302016-08-25T02:04:33+5:30
तीन महिन्यांत जिल्ह्यात २८ शेतक-यांच्या आत्महत्या.

दुष्काळ संपला; पण शेतकरी आत्महत्या थांबेनात!
संतोष येलकर
अकोला, दि. २४: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील दुष्काळ संपला असला, तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याची बाब समोर येत आहे.
गत काही वर्षात बदलत्या वातावरणात कधी अत्यल्प पाऊस, कधी अतवृष्टी तर कधी वादळी वार्यासह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला होता. सतत दोन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत; मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सन २0१४ मध्ये जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४१ आणि २0१५ मध्ये ४७ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर सन २0१६ या वर्षात जून ते २४ ऑगस्टपर्यंत या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी गत दोन वर्षातील दुष्काळानंतर, यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला; मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबल्या नसल्याची स्थिती आहे.