‘एटीएम’मध्ये दुष्काळ, नागरिकांची ‘कॅश’कोंडी
By Admin | Updated: April 26, 2017 01:40 IST2017-04-26T01:40:35+5:302017-04-26T01:40:35+5:30
अकोला : रिझर्व्ह बँकेकडून येणारी कॅश नियमित नसल्याने, गत पंधरवड्यापासून अकोलेकरांची प्रचंड ‘कॅश’कोंडी झाली आहे.

‘एटीएम’मध्ये दुष्काळ, नागरिकांची ‘कॅश’कोंडी
अकोला : रिझर्व्ह बँकेकडून येणारी कॅश नियमित नसल्याने, गत पंधरवड्यापासून अकोलेकरांची प्रचंड ‘कॅश’कोंडी झाली आहे. एकीकडे शहरातील जवळपास सर्वच एटीएम बंद पडले असून, स्वत:च्या बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांना दीड टक्क्याचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही रक्कम ते ग्राहकांकडूनच ऐनकेन प्रकारे वसूल केल्या जात आहे.
कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने गत आठवडाभरापासून नियमित पाठविली जाणारी रोकड कमी केली. त्याचा परिणाम देशभरासह अकोल्यातही जाणवत आहे. अकोला शहरातील निवडक एटीएम सुरू असून, त्यातदेखील काही वेळापुरतीच कॅश असते. त्यामुळे पैशांची निकड असणाऱ्या सर्वसामान्य जनतेमध्ये बँक व्यवस्थापन आणि एटीएमविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत आहे. जिल्हाभरातील जवळपास २०० एटीएम बंद स्थितीत आहेत. बँक अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यास त्यांनी कॅश नसल्याचे सांगितले.
स्टेट बँकेच्या ३५ एटीएमसाठी दररोज तीन कोटींची कॅश लागते; मात्र कॅशचा पुरवठा कमी असल्याने नागरिकांची ओरड कायम आहे. इतर एटीएमला दोन कोटींची कॅश दररोज लागते, त्यामुळे आहे त्या कॅशमधून दररोज थोडी-थोडी कॅश पुरविण्याशिवाय दुसरा पर्याय बँक अधिकाऱ्यांना नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आज शहरात दोन हजार पॉस मशीन असल्या, तरी त्याचा वेगळा भुर्दंड ग्राहकालाच सोसावा लागतो आहे. पॉस मशीनवर स्वाइप करून आर्थिक व्यवहार झाल्यानंतर संबंधित बँकेकडून दीड टक्के सेवा कर कपात केला जातो. हा कर दुकानदार स्वत:च्या खिशातून देत असताना तो ग्राहकावर अतिरिक्त बोजा टाकल्याशिवाय राहत नाही. हा बोजा मात्र छुपा असतो. दीड ते अडीच टक्क्यांपर्यंतचा भुर्दंड ग्राहक किंवा व्यापाऱ्यांवर टाकण्याऐवजी शासनाने अशा व्यवहारावर सूट द्यावी, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहाराकडे वळतील, असे मत काही तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.
कॅश नसल्याचे कारण वेगळे...
एटीएममध्ये कॅश नसल्याचे कारण काही वेगळे आहे. अकोला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड आणि स्टेट बँकेचे व्यवस्थापक एस.टी. बोर्डे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, केवळ रिझर्व्ह बँकेक डे त्यांनी अंगुलीनिर्देश केले; मात्र त्याचे नेमके कारण तरी काय, याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. कॅश नसल्याचे कारण काही वेगळे असल्याचे बोलले जाते.