रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमकांवरही ‘डीआरएम’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:12 IST2018-12-16T16:10:40+5:302018-12-16T16:12:16+5:30
अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला.

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमकांवरही ‘डीआरएम’ची नजर
अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा त्रिवार्षिक निरीक्षणासाठी शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी अकोला दौºयावर येत आहेत. त्यानिमित्ताने अकोला रेल्वेस्थानक आणि परिसराचा चेहरा-मोहरा बदलला जात असून, प्रत्यक्ष पाहणीसाठी डीआरएम शनिवारी अकोल्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रवाशांसाठी अकोला रेल्वेस्थानकावर पार्किंगची व्यवस्था सुसज्ज केली जात असून, ‘ड्रॉप अॅण्ड गो’ची सेवा सुरू होत आहे. ही सेवा व्हीआयपी आणि फोर-व्हीलरसाठी सुटसुटीत राहणार आहे. आॅटोरिक्षा चालकांना रेल्वे हद्दीत जागा दिली आहे, तेवढी पुरेशी आहे. इतर ठिकाणी ही जागा शहर हद्दीतून दिली जाते, असेही ते म्हणाले. यापुढे नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल, असा इशाराही यादव यांनी दिला. भुसावळच्या धर्तीवर अकोल्यात कारवाई होईल काय, असा प्रश्न केला असता, त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाºयांना तातडीने विचारणा केली. तारफैल, देशमुख फैल, नायगावपासून अनेक ठिकाणी अकोल्यात रेल्वे जागांवर अतिक्रमण केल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी डीआरएम यांना येथे दिली. या सर्वांना नोटीस पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. अकोल्यातील अतिक्रमकांवर आपले लक्ष असल्याचे सांगून ते भुसावळकडे रवाना झालेत. डीआरएमसमवेत अधिकाºयांचा मोठा ताफा होता; मात्र स्थानिक रेल्वे समितीचे पदाधिकारी शनिवारी अनुपस्थित होते.
पाच वर्षे तरी तुटणार नाही आरएमएस बिल्डिंग!
रेल्वेस्थानक विस्तारात जुनी असलेली आरएमएस बिल्डिंग पाडल्या जाणार होती. पाडल्या जाणाºया बिल्डिंगची रंगरंगोटी सुरू असल्याने पत्रकारांनी त्यावर संशय व्यक्त केला. त्यावर अजून पाच वर्षे तरी आरएमएसची बिल्डिंग तुटणार नसल्याचे उत्तर दिले. मग प्लॅटफॉर्म विस्ताराचे काय ते होईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावरील आरएमएसची बिल्डिंग रेल्वेस्थानकात अडसर आहे. ई-मेल आणि सोशल मीडियाच्या जगात एवढ्या मोठ्या बिल्डिंगची आवश्यकता नाही, असे मत यावर झेआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका यांनी व्यक्त केले.
२१ डिसेंबरला महाव्यवस्थापक अकोल्यात
त्रिवार्षिक निरीक्षणासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी अकोल्यात येत आहेत. या दौºयाच्या निमित्तानेच भुसावळ डीआरएमचे दौरे अकोल्यात वाढले आहेत. २१ डिसेंबरच्या आधी पुन्हा एकदा ते अकोल्यात येण्याची शक्यता आहे.