एसटी चालक-वाहकांच्या कर्तव्य वाटपात होतोय कसूर!
By Admin | Updated: April 8, 2017 01:37 IST2017-04-08T01:37:42+5:302017-04-08T01:37:42+5:30
वाहतूक निरीक्षक करताहेत रोटेशन पद्धतीचा गैरवापर : कर्मचाऱ्यांची सामूहिक तक्रार

एसटी चालक-वाहकांच्या कर्तव्य वाटपात होतोय कसूर!
अकोला: वाहतूक निरीक्षक पी. के. इंगळे हे एसटी चालक -वाहकांच्या कर्तव्य वाटपात कसूर करीत असल्याची सामूहिक तक्रार, आगार क्रमांक २ मधील कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या माध्यमातून अकोला विभाग नियंत्रकांकडे केली आहे. कर्मचारी प्रचंड ताण-तणावात काम करीत असून, मर्जीतील लोकांना अभय देत इतर कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची विनंती लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अकोला आगार क्रमांक १ मध्ये ४0 बसेस, तर चालक १११ आहेत आणि आगार क्रमांक २ मध्ये ६५ बसेस, तर २१0 चालक आहेत. बस गाड्यांच्या तुलनेत चालकांची संख्या अधिक असल्याने, रोटेशन पद्धतीने चालकांना कर्तव्य वाटप अर्थात ड्युट्या अलॉट केल्या जातात; मात्र आगार क्रमांक २ चे वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे हे एसटी चालक-वाहकांच्या कर्तव्य वाटपात कसूर करीत असल्याची बाब विभाग नियंत्रकांना सादर करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. ड्युट्या अलॉट करताना ‘रोटेशन’च्या नावाखाली दुर्लक्षित चालक-वाहकांच्या रात्री मुक्कामी ड्युट्या लावल्या जातात, तर मर्जीतील चालक-वाहकांना दिवसपाळीत ड्युट्या अलॉट करून, त्याच्या ओव्हरटाइमची सोय लावली जाते. गैरहजर राहणाऱ्या दुर्लक्षित कर्मचाऱ्यांवर कारवाई, तर मर्जीतील कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जाते. रजेसंदर्भातसुद्धा कर्मचाऱ्यांसोबत अशाच पद्धतीने दुजाभाव केला जात असल्याची तक्रार के. एम. सुरवाळे यांनी पुराव्यानिशी सादर केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी आगारात ५00 रुपये प्रती माह लकी-ड्रॉ स्कीम सुरू केली असून, त्यात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांवर ते दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे दुर्लक्षित चालक-वाहकांच्या महिन्याच्या पगारावर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक भुर्दंड आम्हीच का सहन करावा, याकरिता सातत्याने चालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. याचा परिणाम प्रचंड ताण-तणावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे यांच्या मनमानी कारभाराकडे कुणाचेच कसे लक्ष नाही, असा प्रश्न उपस्थित करून, या प्रकरणाची चौकशी करून वाहतूक निरीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.
सामूहिक तक्रारीवर १०६ कर्मचाऱ्यांनी केल्या स्वाक्षरी
एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे यांच्याविरुद्ध विभाग नियंत्रक यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सर्व कर्मचारी संघटनांशी निगडित असलेल्या आगारातील १०६ कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची प्रत मुंबई येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह अकोल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनादेखील सादर केली आहे.
कर्मचाऱ्यांची सामूहिक तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल. या प्रकरणात संबंधित अधिकारी दोषी आढळत असतील, तर निश्चितच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
- रोहन पलंगे (विभाग नियंत्रक), एसटी महामंडळ, अकोला.