चालकाने मद्य प्राशन करून बस चालविली, अनर्थ टळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST2021-02-15T04:17:21+5:302021-02-15T04:17:21+5:30
अकोल्याहून दररोज रात्री ८.१५ वाजता खेट्री येथे मुक्कामी बस फेरी येते. खेट्री येथे बसगाडी १०.१५ वाजता पोहोचते आणि मुक्काम ...

चालकाने मद्य प्राशन करून बस चालविली, अनर्थ टळला!
अकोल्याहून दररोज रात्री ८.१५ वाजता खेट्री येथे मुक्कामी बस फेरी येते. खेट्री येथे बसगाडी १०.१५ वाजता पोहोचते आणि मुक्काम करून सकाळी ७ वाजता अकोला येथे परत जाते. शनिवारीसुद्धा रात्री ८.१५ वाजता अकोला-खेट्री एसटी बस निघाली. वाडेगावपर्यंत चालकाने बस व्यवस्थित चालविली. परंतु वाडेगाव येथे काही प्रवाशांना उतरविले. नंतर चालकाने भरधाव बस चालविण्यास सुरुवात केल्यामुळे चालकाने मद्य प्राशन केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बस भरधाव चालवू नका, असे प्रवाशांनी चालकाला सांगितल्यावरही चालक काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सस्ती ते खेट्री १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था व मोठमोठे खड्डे असल्याने अपघाताची दाट शक्यता होती. त्यामुळे बसमधील एका तरुण प्रवाशाने हिंमत दाखवून थेट चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांना फोन केला. ठाणेदार राहुल वाघ यांनी सदर बाब गंभीरतेने घेऊन कर्मचाऱ्यांसह बस चान्नी येथे थांबविली आणि बस चालकाला ताब्यात घेऊन चतारी ग्रामीण रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी केली. पोलिसांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार राहुल वाघ यांनी सांगितले.
फोटो:
प्रवासी थोडक्यात बचावले
वाडेगावपासून काही किलोमीटर अंतरापर्यंत बस चालकाने बस व्यवस्थित चालविली. नंतर बस भरधाव चालवित आणली. चान्नी येथे पोहोचेपर्यंत दोन-तीन वेळा अपघात होता-होता राहिला. पोलिसांनी बस थांबविल्यावर प्रवासी बसमधून उतरले. एका प्रवाशाने सदर प्रकाराबाबत पोलिसांना सविस्तर माहिती दिली.