वहिनीवर अत्याचार करणाऱ्या दिरास अटक
By Admin | Updated: June 7, 2017 01:16 IST2017-06-07T01:16:22+5:302017-06-07T01:16:22+5:30
अकोला: विधवा वहिनीला डांबून ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या दिरासह कुटुंबीयांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वहिनीवर अत्याचार करणाऱ्या दिरास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधवा वहिनीला डांबून ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या दिरासह कुटुंबीयांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिरास मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस गुरुवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पतीचा मृत्यू झाल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनासाठी सासरी राहणाऱ्या विधवा महिलेवर तिचा दीर सुनील शर्मा याने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास कुटुंबाची बदनामी होणार असल्याने सदर महिलेला डांबून ठेवत सासरच्यांनी तिचा छळ केला. यासोबतच तिच्यावर दिराने दोन वेळा अत्याचार केल्यानंतर विधवा वहिनीस खोलीत डांबून ठेवले. या अत्याचारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिने घडलेल्या अत्याचाराची आपबिती खदान पोलिसांना सांगितली. पोलिसांनी प्रकरण आपसात करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही महिलेने तक्रार दिल्यानंतर खदान पोलिसांनी नरेंद्र छगन शर्मा, शिलादेवी नरेंद्र शर्मा, मुकेश नरेंद्र शर्मा, संगीता मुकेश शर्मा, श्याम नरेंद्र शर्मा, नीशा श्याम शर्मा आणि सुनील नरेंद्र शर्मा यांच्याविरुद्ध महिलेचा पैशांसाठी छळ करणे, जबरदस्तीने शारीरिक शोषण करणे, घरात डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील शर्मा याने विधवा महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याने त्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.