२७ कोटींच्या योजनेचा ‘डीपीआर’ तयार; प्रतीक्षा कशाची?
By Admin | Updated: April 22, 2016 02:33 IST2016-04-22T02:33:24+5:302016-04-22T02:33:24+5:30
मोर्णा ते महानपर्यंतच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’ मजीप्राकडे; अकोला शहरावर पाणीटंचाईचे सावट.

२७ कोटींच्या योजनेचा ‘डीपीआर’ तयार; प्रतीक्षा कशाची?
आशीष गावंडे / अकोला
मोर्णा धरणातील जलसाठय़ाचा वापर करण्याच्या दृष्टीने मोर्णा ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन शासनाने २७ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजनेचा प्राथमिक स्तरावर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. यादरम्यान, शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेत २७ कोटींच्या जलवाहिनीचा समावेश झाला. शहरावरील पाणीटंचाईचे सावट पाहता, मजीप्राने तयार डीपीआरमध्ये तांत्रिक फेरबदल करून आजवर प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे महापौर उज्ज्वला देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराचे भविष्य लक्षात घेऊन आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मोर्णा धरणातील आरक्षित जलसाठय़ाचा अकोलेकरांसाठी वापर करण्याच्या उद्देशातून मोर्णा ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेता, शासनाने मोर्णा ते महान धरणापर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केला. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २७ कोटीनुसार प्राथमिक स्तरावर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला.