बाळापूरच्या किल्ल्याचा दरवाजा तुटला!
By Admin | Updated: November 7, 2014 23:10 IST2014-11-07T23:10:12+5:302014-11-07T23:10:12+5:30
पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील किल्ल्याची दुर्दशा.

बाळापूरच्या किल्ल्याचा दरवाजा तुटला!
बाळापूर (अकोला): येथील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या किल्ल्याचा पश्चिममुखी २0 फूट उंचीच्या लाकडी दरवाजाचा एक भाग गुरुवारी तुटून पडला. येथील किल्ल्यात प्रशासकीय कार्यालय आहे. किल्ला पहावयास आलेल्या काही हौशी पर्यटकांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी दरवाजा उघड-बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात लाकडी फळी तुटल्याने हा दरवाजा कोसळला. सध्या हा दरवाजा एका लोखंडी साखळीवर अडकलेला असल्यामुळे तो पूर्णपणे कोसळला नाही. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी देखरेखीसाठी असतानाही हा प्रकार घडला आहे. २0 फूट उंच असलेल्या या दरवाजाचे दोन भाग असून, एक भाग उभा आहे; परंतु दुसरा भाग लोंबकळत आहे. या दरवाजातून लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने हा दरवाजा तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष रमेश लोहकरे, गणेश धोपटे आदींनी केली आहे.