सेवाविनृत्त प्राध्यापकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान
By Admin | Updated: April 20, 2015 01:48 IST2015-04-20T01:48:44+5:302015-04-20T01:48:44+5:30
रमेश बंग यांचे आकस्मिक निधन

सेवाविनृत्त प्राध्यापकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान
अकोला - एलआरटी महाविद्यालयातून सेवानवृत्त झालेले प्राध्यापक रमेश देवकिसन बंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान देण्यात आला. त्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सेवानवृत्त प्राध्यापक रमेश देवकिसन बंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ होते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अतुल बंग यांचे ते वडील होते. स्थानिक एलआरटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी दिलेली सेवा आजही त्यांच्या विद्यार्थ्यांंना त्यांच्याबद्दल सन्मान ठेवून आहे. अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून आपले शरीर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांंच्या शिक्षणासाठी दान द्यावे, असे रीतसर पत्र वैद्यकीय महाविद्यालयाकडे दिले होते. डॉ. जुगल चिराणीया यांना नेत्रदानाची माहिती देताच त्यांच्या चमूने तातडीने येऊन नेत्रगोलक काढण्याचे काम पूर्ण केले. पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन सरळ नेत्रदान करावे या त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वैकुंठरथामध्ये त्यांचा मृतदेह ठेवून वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. आज सुटीचा दिवस असतानाही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आले. या कार्यात डॉ. महेश गांधी आणि डॉ. सदानंद भुसारी यांनी मोलाची साथ दिली. त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात देताना सर्वांंना गहिवरुन आले होते.