पोटाची खळगी भरत नाही; थांबून तरी काय करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:33 IST2020-05-11T10:32:44+5:302020-05-11T10:33:02+5:30
रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.

पोटाची खळगी भरत नाही; थांबून तरी काय करणार ?
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच जालना येथील स्टील इंडस्ट्रीजमध्ये रोजंदारीने कामावर असलेल्या उत्तर प्रदेशातील तब्बल २४ मजुरांनी राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांच्याच सोबत असलेल्या आणखी १६ मजुरांचा जथा त्यांच्या पुढे गेला असून, ते नागपूरपर्यंत पोहोचले, तर २४ मजुरांचा हा गट शुक्रवारी अकोल्यातून नागपूरकडे हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करीत होते. पोटाची खळगी भरत नाही, आता थांबून काय करणार रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.
जालना येथील स्टील उद्योग देशात प्रसिद्ध आहे. येथे उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यातील ६० च्या वर मजूर कामाला होते; मात्र कोरोनाचे संकट सुरू होताच लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योगही बंद पडला. मजुरांचे दोन वेळ जेवणाचे वांधे झाले. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्र सोडून त्यांच्या उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र ज्यांच्याकडे कामाला होते, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने या युवकांनी गत आठवड्यात उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. जालना येथून अकोला आल्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन राष्ट्रीय महामार्गाने ते नागपूर मार्गे पुढे उत्तर प्रदेशात जाण्यासाठी त्यांनी हा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला.महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या भीतीने एकही वाहन त्यांना मिळत नसल्याची खंतही यावेळी मजुरांनी व्यक्त केली.
उद्योजकांनी सोडले वाºयावर!
जालन्यातील ज्या स्टील इंडस्ट्रीजमध्ये हे मजूर कामाला होते, त्याच उद्योजकाने यांना उत्तर प्रदेशात सोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली; मात्र उद्योजकाने पगारही बंद करून एमआयडीसी सोडण्याचे सांगितले.
त्यामुळे हजारो किलोमीटरचा हा पायी प्रवास करावा लागत असल्याचेही त्यांनी यावेळी ‘लोकमत’ला सांगितले.