अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये कूलर लावण्यात आले खरे; परंतु दोन वार्ड सोडले तर उर्वरित सर्वच वार्डांमधील कूलर बंद आहेत. नव्हे तर धूळ खात पडले आहेत. गत आठवडाभरापासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उष्णतेच्या लाटेतही सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना उष्ण वातावरणात राहून उपचार घ्यावे लागतआहे तर दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका कूलर, वातानुकूलित यंत्राच्या हवेत बसत असल्याचे चित्र आहे. डॉक्टर, परिचारिका कूलर, एसीत बसतात. रुग्ण मात्र कूलरविना तपत असल्याचे विदारक दृश्य गुरुवारी लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. शासन रुग्णांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. रुग्णांच्या सोई-सुविधांसाठी महागडी यंत्रसामग्री, कूलर, वातानुकूलित यंत्र, पंखे आदींची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येते; परंतु त्यांचा रुग्णालय प्रशासन कशा पद्धतीने दुरुपयोग करते; याचे मूर्तिमंत उदाहरण गुरुवारी वार्डांचा फेरफटका मारल्यावर दिसून येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी रुग्णांसाठी सर्वच वार्डांमध्ये कूलर लावण्यात आल्याचे सांगितले होते; परंतु हे कूलर सुरू आहेत की नाही, कूलरमध्ये पाणी टाकले जाते की नाही, याची शहानिशा करण्याची मात्र कुणी तसदी घेत नाही. गत दोन दिवसांपासून शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक गर्मीने घामाघूम झाले आहेत. रुगालयात २१ वार्ड आहेत. या वार्डांंमध्ये दररोज ५५0 च्यावर रुग्ण उपचार घेतात. या रुग्णांना थंडगार हवा मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने वार्डांमध्ये कूलर लावले आहेत. गुरुवारी लोकमत प्रतिनिधीने सर्वोपचार रुग्णालयामधील वार्डांंमधील कूलरच्या स्थितीबाबतचा आढावा घेतला असता, बहुतांश वार्डांंमधील कूलर बंद स्थितीत धूळ खात पडल्याचे दिसून आले. वार्ड क्रमांक ६ व ७ मध्ये कूलर आहेत; परंतु ते बंद आहेत. कूलरच्या टपाचा वापर कचरा टाकण्यासाठी होत असल्याचे दिसून आले. वार्ड क्रमांक ५ व ७ मध्ये कूलर सुरू असल्याचे दिसून आले; परंतु त्यात पाणी नव्हते. त्यामुळे गर्मीत गरम हवा फेकत असलेल्या कूलरचाही रुग्णांना त्रास होत होता. यासोबतच इतरही वार्डांंमध्ये लावलेले कूलर नुसते शोपीस बनून पडून आहे. रुग्णालयातील विदारक स्थिती पाहून ट्रॉमाकेअर सेंटर केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
डॉक्टर एसीत; रुग्णांसाठीच्या कूलरमध्ये पाणीही नाही!
By admin | Updated: May 20, 2016 01:44 IST