दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी गर्दी करु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:44+5:302021-03-27T04:18:44+5:30
अकोला : खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीसाठी जे मुद्रांक शुल्क भरुन तसेच निष्पादित केलेले असतात, अशा दस्तऐवजांची नोंदणी करण्यासाठी चार ...

दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी गर्दी करु नका
अकोला : खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीसाठी जे मुद्रांक शुल्क भरुन तसेच निष्पादित केलेले असतात, अशा दस्तऐवजांची नोंदणी करण्यासाठी चार महिन्यांची मुदत असते, त्यामुळे ३१ मार्च या आर्थिक वर्षअखेरीस कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८नुसार खरेदी-विक्री व्यवहारांच्या दस्तऐवजांवर शासन महसूल व वन विभागाच्या दिनांक २९ ऑगस्ट २०२०च्या राजपत्रानुसार सवलतीच्या दराने लागू असलेल्या मुद्रांक शुल्क दराची मुदत दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंत निष्पादित केलेल्या व मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तऐवजाची नोंदणी चार महिन्यांच्या आत करता येते, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता, नोंदणी विभागाच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी करु नये. याठिकाणी अनिवार्य कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.