फलकावर अडगाव खुर्दचे नावच नाही !
By Admin | Updated: August 11, 2014 00:53 IST2014-08-11T00:32:14+5:302014-08-11T00:53:40+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

फलकावर अडगाव खुर्दचे नावच नाही !
अडगाव खुर्द : आकोट -हिवरखेड मार्गावर अडगाव खुर्द फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लावलेल्या दिशादर्शक फलकावरून अडगाव खुर्द या गावाचे नावच नसल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.आकोट-हिवरखेड मार्गावर असलेल्या अडगाव खुर्द येथे ३ व ४ ऑगस्ट रोजी आई लक्ष्मीमाता यात्रा महोत्सव पार पडला. या यात्रेमध्ये येणार्या भाविकभक्तांना अडगाव खुर्द गावाचे नाव फलकावर दिसलेच नसल्याने हजारो भाविकभक्तांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला. काही भाविक तर येथून ३ कि. मी. दूर असलेल्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. या गावाला जाऊन परत आले. अडगाव खुर्द या फाट्यावरून अनेक रस्ते जातात. यामध्ये उत्तरेस पिंप्री जैनपूर, पिंप्री खुर्द, बेलुरा, दक्षिणेस अडगाव खुर्द, सिरसोली, सिरसोली मार्गे पाथर्डी, अडगाव खुर्द मार्गे सिरसोली-मुंडगाव-तेल्हारा, अडगाव खुर्द मार्गे सिरसोली, काळेगाव, बेलखेड, तेल्हारा तसेच अडगाव खुर्द मार्गे सिरसोली, भोकर, आकोली रूपराव, वरूड बिहाडे असे अनेक लहान-मोठय़ा गावांना अडगाव खुर्द या फाट्यावरून जाण्यास सरळ आणि सोपा मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकावरून नाव गायब करण्याच्या प्रतापामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास होत आहे. फलकावर या गावाचे नाव नसल्याने ते भलतीकडेच भरकटत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून आर्थिक नुकसानसुद्धा होत आहे. आता सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत. प्रवासी मोठय़ा प्रमाणात बाहेरगावाला ये-जा करतात. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी अडगाव खुर्द फाट्याजवळ लावलेले गावदर्शक फलकावर दुरुस्ती करून तत्काळ अडगाव खुर्द हे नाव टाकण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व गावकरी करीत आहेत.