दिवाळीत व्यावसायिकांचे ‘दिवाळे’
By Admin | Updated: October 26, 2014 00:41 IST2014-10-26T00:41:04+5:302014-10-26T00:41:04+5:30
अकोला शहरात दिवाळीनिमित्त झाली ३४ कोटी रुपयांची उलाढाल,मात्र मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के घट.

दिवाळीत व्यावसायिकांचे ‘दिवाळे’
अकोला : दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण. या सणानिमित्त नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. याही दिवाळीत कोट्यवधींची खरेदी अपेक्षित असताना पीक परिस्थितीचा फटका या सणाला बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा २५ टक्के कमी उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल म्हणून विविध व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये भरगच्च माल भरला; परंतु अपेक्षित व्यवसाय न झाल्याने या दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे दिसून आले. मात्र गतवर्षीच्या तुलनेने यंदा कार खरेदी २0 टक्के वाढल्याचे व्यावसायिकांनी नमूद केले आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील हातचे पीक गेल्याने शेतकरी पुरता खसला. गारपिटींमुळे शेतकर्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले. गहू, हरभरा, भुईमूग, कपाशी, फळबागा पिके उद्ध्वस्त झाले. कर्ज काढले, संपूर्ण कुटुंब शेतात राबले, पीक उभे झाले; मात्र गारपिटीने तोंडचा घास पळविला, आता संसाराचा गाडा कसा ओढू, या विवंचनेत शेतकरी सापडला. अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, बाळापूर, तेल्हारा तालुक्यातील गहू, हरभरा, लिंबू पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यंदा अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिकंही समाधानकारक नाहीत. पिक परिस्थितीचा फटका सर्वच क्षेत्रातील उलाढालीवर झाला आहे. दसरा-दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण सणाच्या दिवसात उद्योग क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात उलाढाल झाल्यामुळे ऐन दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे चित्र आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने तसेच मोटार, कार, ट्रॅक्टर्स, दुचाकी, तीनचाकी वाहन व फ्रीज, मोबाईल फोन, एलईडी, वॉशिंग मशीन सोफासेट आदी वस्तू व्यावसायिकांनी दुकानांमध्ये भरून ठेवल्या होत्या. मात्र सोयाबीन व अन्य रोख उत्पन्न देणार्या पिकांनी दगा दिल्यामुळे बळीराजा खरेदीसाठी बाजारात फिरकलाच नाही. नोकरदारांमुळे निदान ४0 ते ४५ टक्के व्यवसाय झाल्याचे मत व्यापार्यांनी व्यक्त केले. मात्र आवश्यक असणार्या वस्तूंच खरेदी करण्याकडे सामान्य वर्गाचा कल होता.