जिल्ह्यात आता ‘संपूर्ण लॉकडाऊन’चाच पर्याय; जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 20:00 IST2021-05-06T20:00:38+5:302021-05-06T20:00:45+5:30
Lockdown in Akola : संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनाचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे संकेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

जिल्ह्यात आता ‘संपूर्ण लॉकडाऊन’चाच पर्याय; जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले संकेत
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कोविड संसर्गाची संख्या वाढत आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढत आहे. असे असतांनाही लोक मात्र या ना त्या कारणाने घराबाहेर पडत असून गंभीर दिसत नाहीत, तेव्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनाचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे संकेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
यासंदर्भात जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार , जिलाह पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. अपार तसेच अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.
सकाळी आठ ते ११ ही वेळ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र या वेळेत तर लोक प्रचंड गर्दी करतात शिवाय या नंतरही या ना त्या कारणाने लोक बाहेर पडत असतात. एकीकडे रुग्ण संख्या वाढतेच आहे. शिवाय मृत्यू संख्या वाढती आहे. त्याचबरोबर आता संसर्ग हा ग्रामीण भागातही वाढत आहे. बेड व उपचार सुविधा उपलब्ध असली तरी उपचार पुरविणाऱ्या मनुष्यबळाच्या मर्यादा आहेत. रुग्णांची हेळसांड न होऊ देणे या बाबीसही प्रशासनाचे प्राधान्य आहे. हा विचार करता विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच संपूर्ण लॉकडाऊन या पर्यायाचा प्रशासन गांभियाने विचार करत आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व यंत्रणांना दिले.