पावसामुळे जिल्हास्तरीय युवा महोत्सव पुढे ढकलला
By रवी दामोदर | Updated: November 27, 2023 18:24 IST2023-11-27T18:24:03+5:302023-11-27T18:24:54+5:30
महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळवले आहे.

पावसामुळे जिल्हास्तरीय युवा महोत्सव पुढे ढकलला
अकोला : क्रीडा विभागातर्फे १५ ते २९ या वयोगटातील युवक व युवतींच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव दि. २८ नोव्हेंबर रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. तथापि, पावसामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. हा महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळवले आहे.
जिल्ह्यातील युवक व युवतींच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी तसेच राज्यासाठी तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पनेवर शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. २८ नोव्हेंबर २०२३ या रोजी करण्यात आले होते. परंतु रविवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने हा युवा महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित!
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शहरात आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव पुढे ढकलला आहे. आगामी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युवा महोत्सव नियोजित असल्याची माहिती आहे. सहभाग घेण्यासाठी प्रवेश अर्ज २ डिसेंबरपर्यंत सादर करण्यास मुदत मिळाली आहे.