जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; पीक नुकसानीची केली पाहणी !
By संतोष येलकर | Published: April 12, 2024 07:40 PM2024-04-12T19:40:28+5:302024-04-12T19:40:40+5:30
अवकाळीचा तडाखा : पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
अकोला: जिल्हयात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी पातूर तालुक्यातील तीन गावांना भेटी देत, शेतीच्या बांधावर पोहोचून पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
गेल्या ९ व १० एप्रिल रोजी जिल्हयातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.उन्हाळी गहू, भुइमूग, कांदा, भाजीपाला पिकांसह फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी १२ एप्रिल रोजी जिल्हयातील पातूर तालुक्यातील अंबाशी, देऊळगाव, जांभरुन या तीन गावांना भेटी देत शेतातील पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी पातुरचे तहसीलदार राहुल वानखडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत संबंधित तीन गावांच्या परिसरात आंब्याची झाडे, लिंबूच्या बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा आदी विविध पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने पीक नुकसानीचे काटेकोर पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले.
शेतकऱ्यांशी साधला संवाद; नुकसानीची घेतली माहिती !
पाहणीदरम्यान, जिल्हाधिकारी कुंभार यांनी शेतकऱ्यांंसोबत संवाद साधून त्यांचे म्हणणे एेकूण घेतले व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची माहिती घेतली.
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये !
पीक नुकसानीचे सर्व तपशीलासह काटेकोर पंचनामे करुन, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.