डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण
By Atul.jaiswal | Updated: February 14, 2024 16:27 IST2024-02-14T16:26:23+5:302024-02-14T16:27:52+5:30
४०४० स्नातकांना पदव्या प्रदान, मुलींनी पटकाविली सर्वाधिक पदके.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण
अतुल जयस्वाल, अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी थाटात पार पडला. विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या हस्ते ४०४० पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच ३१ सुवर्ण, १४ रौप्यपदकांचे वितरण केले व ३१ रोख व ३ पुस्तक स्वरुपात बक्षिसे देण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सभागृहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर विविध विद्यापीठांतील कुलगुरू, कार्यकारी परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, शास्त्रज्ञ उपस्थित होते. पदके प्रदान करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वप्रथम डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीचे वितरण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. यामध्ये मुलींनी बाजी मारून सर्वाधिक पदके पटकाविली.
कृषी महाविद्यालयाच्या भावेशला पाच सुवर्ण :
कृषी महाविद्यालयातील एम.एस्सी. (कृषी) चा विद्यार्थी भावेश संजय अग्रवाल याला कीटकशास्त्र विषयात पाच सुवर्ण मिळाले. याशिवाय एक रौप्यपदक देखील मिळाले आहे. यावर्षी सर्वाधिक सुवर्ण पदकांची कमाई त्याने केली. एम.एस्सी.ची प्रणाली कोटनाके हिने तीन सुवर्ण, दोन रौप्य अशी पाच पदके मिळवली.