दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप तालुका स्तरावर!

By Admin | Updated: January 13, 2015 01:29 IST2015-01-13T01:29:07+5:302015-01-13T01:29:07+5:30

७५ कोटींचे वितरण ;दोन दिवसांत वाटप सुरू होणार.

Distribution of allotment to drought-hit farmers at taluka level! | दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप तालुका स्तरावर!

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप तालुका स्तरावर!

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त झालेला ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. तालुका स्तरावरून दोन दिवसांत मदतीचे वाटप सुरू करण्यात येणार असून, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्वच पिके हातून गेली. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ४ लाख ३0 हजार ४ हेक्टर ९५ आर क्षेत्रावरील पिकांचे उत्पादन बुडाले. या पीक नुकसानभरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाकरिता १४४ कोटी ५१ लाख ९५ हजार ४८२ रुपयांच्या मदतनिधीची आवश्यकता आहे. त्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मदतनिधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यात, शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध झालेला मदतनिधी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, १२ जानेवारीला जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर तहसीलदारांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला.
उपलब्ध मदत निधीतून तहसील कार्यालयांमार्फत दोन दिवसांत (बुधवारपासून) दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या बँकनिहाय याद्या बँकेत सादर करून मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत प्राप्त झालेला मदतनिधी कमी असल्याने, इंग्रजी वर्णाक्षरानुसार गावांची निवड करून, संबंधित गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिले आहेत.

Web Title: Distribution of allotment to drought-hit farmers at taluka level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.