वीज पुरवठा खंडित; शेतकरी सिंचनापासून वंचित
By Admin | Updated: November 9, 2014 00:32 IST2014-11-09T00:32:20+5:302014-11-09T00:32:20+5:30
तेल्हारा तालुक्यात रोहित्र जळाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून केवळ तीनच तास वीजपुरवठा.

वीज पुरवठा खंडित; शेतकरी सिंचनापासून वंचित
अकोला: तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे रोहित्र जळाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून केवळ तीनच तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याची व्यवस्था असल्यावरही सिंचन करू शकत नाही. आगामी दोन दिवसांच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास उपोषण करण्याचा इशारा गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, अडगाव बु. येथील पाच एम.व्ही.ए. चे रोहित्र तीन महिन्यांपूर्वी जळाले. तेव्हापासून वीज पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. तसेच महावितरणच्यावतीने रोहित्राची दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. सध्या अडगाव व १६ गावांना एकाच रोहित्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे अडगावमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा सुरू असतो. सध्या शेतातील रब्बी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, विद्युत पुरवठय़ाअभावी पाणी असल्यावरही पिके सिंचनापासून वंचित राहत आहेत. गावातील सर्वच शेतकर्यांचे उत्पादनाचे शेत हेच एकमेव साधन आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप हंगाम गेला आता केवळ रब्बी हंगामावर आशा आहे. मात्र विजेअभावी पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. आगामी दोन दिवसाच्या आत गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.