कर्जमाफीच्या गोंधळाने शेतकर्यांमध्ये असंतोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:36 IST2017-08-24T01:36:47+5:302017-08-24T01:36:47+5:30
अकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला.

कर्जमाफीच्या गोंधळाने शेतकर्यांमध्ये असंतोष!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला.
शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकर्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; परंतु कर्जमाफीच्या घोषणेनंतर यासंदर्भात वारंवार निकष व निर्णय बदलण्यात येत असल्याच्या गोंधळामुळे २0 टक्के शेतकर्यांनाही या कर्जमाफीचा लाभ होण्याची चिन्हे नसल्याने, विदर्भासह राज्यभरात शेतकर्यांमध्ये असंतोषाची भावना पसरली असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. गत तीन वर्षांपासून राज्यातील शेतकरी व शेतमजूर दुष्काळ, नापिकी तसेच शेतमालाचे कमी झालेले भाव , नोटाबंदी व इतर कारणांमुळे शेतकरी-शेतमजूर त्रस्त झाला आहे, असे सांगत आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकर्यांसह ग्रामीण जनतेचे अर्थकारण मोडीत निघाले असून, शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकर्यांसाठी जाहीर केलेले सोयाबीन व भात पिकाचे अनुदान दोन वर्षांपासून शेतकर्यांना मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतीच्या विविध प्रश्नांवर शेतकरी समाजाने संघटित लढा उभारण्याची गरज आहे. त्यानुषंगाने शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी किसान मंचच्यावतीने १ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही धोंडगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशंत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, सम्राट डोंगरदिवे, सैयद वासीफ , विजय देशमुख, शेख अन्सार, ज्ञानेश्वर सुलताने, प्रशांत नागे, मयूर वहिले, राहुल घाटे उपस्थित होते.
कर्जमाफी उपकार नाही!
राज्य सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा काही उपकार नाही, तर घटनेतील तरतूद आहे, असे सांगत कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असेही शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी सांगितले.
आजपासून जिल्ह्यात संवाद यात्रा!
गत १ ऑगस्टपासून सेवाग्राम येथून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत संवादयात्रा २४ ते २६ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये किसान मंच व शेतकरी जगार मंचच्यावतीने कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव, यासह शेतकर्यांच्या इतर मागण्यांसंदर्भात शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.