दुर्धर आजाराच्या रुग्णांची मदत आता थेट बँक खात्यात
By Admin | Updated: July 20, 2014 02:00 IST2014-07-20T01:56:09+5:302014-07-20T02:00:33+5:30
अकोला जिल्हा परिषदेचा निर्णय राज्यातील पहिली जिल्हा परिषद.

दुर्धर आजाराच्या रुग्णांची मदत आता थेट बँक खात्यात
अकोला: दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत पात्र लाभार्थी रुग्णांची मदत धनादेशाऐवजी आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे दुर्धर रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यास होणारा विलंब टळणार आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद आहे.
राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हृदयरोग, कर्करोग आणि किडनी अशा दुर्धर आजारांच्या रुग्णांसाठी आर्थिक मदतीची योजना राबविली जाते. दुर्धर रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत पात्र लाभार्थी रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या लाभार्थी यादीनुसार, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांमार्फत पात्र रुग्णांना धनादेश दिले जातात. या प्रक्रियेत दुर्धर रुग्णांपर्यंंत प्रत्यक्ष मदत पोहोचण्यात दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटतो. दुर्धर रुग्णांना आर्थिक मदतीचा लाभ मिळण्यास होणारा हा विलंब लक्षात घेता, रुग्णांना मदतीचा तातडीने लाभ मिळावा, यासाठी मदतीची रक्कम धनादेशाद्वारे न देता, थेट रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय, अकोला जिल्हा परिषदेने नुकताच घेतला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती राधिका पाटील धाबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, तशा आशयाचा ठराव गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दुर्धर रुग्णांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेत रुग्णांना दिल्या जाणारी मदतीची रक्कम थेट रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असल्याचे सांगीतले. त्यामुळे रुग्णांना आता तातडीने मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांकडून त्यांचे बँक खाते क्रमांक मागविण्यात आले आहेत.