रेल्वेसंबंधी खासदारांची अधिका-यांसोबत चर्चा

By Admin | Updated: January 11, 2015 01:10 IST2015-01-11T01:10:18+5:302015-01-11T01:10:18+5:30

अकोला मार्गे नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रस्ताव.

Discussion with railway officials | रेल्वेसंबंधी खासदारांची अधिका-यांसोबत चर्चा

रेल्वेसंबंधी खासदारांची अधिका-यांसोबत चर्चा

अकोला- दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नांदेड येथे खासदारांसोबत रेल्वेसंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी अकोल्यातील रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. तसेच काही गाड्यांचे दिवस वाढविणे तर काही नवी गाड्यांचे प्रस्ताव अधिकार्‍यांना देण्यात आले.
नांदेड येथे गुरुवारी झालेल्या या बैठकीला खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत विदर्भ चेंबरचे माजी अध्यक्ष व रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका उपस्थित होते. खासदार आणि अकोल्यातील रेल्वे प्रतिनिधींनी रेल्वे अधिकार्‍यांपुढे येथील समस्या मांडल्यात. यात प्रामुख्याने रखडलेल्या गेज परिवर्तनाच्या कामाचा समावेश होता. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ हे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ व ३ सोबत जोडणे, दक्षिण-मध्य रेल्वेच्या अकोला स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था व कव्हर शेड बसविणे, दुसर्‍या क्रमांकाच्या ओव्हर ब्रिजला सातव्या प्लॅटफार्मपर्यंंत वाढविणे, अकोला रेल्वे स्थानकावर पीआयटी लाइनचा विकास करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय यशवंतपूर-बंगलोर गाडी आठवड्यातून दोन वेळा, सिकंदराबाद-जयपूर गाडी आठवड्यातून दोन वेळा, हैदराबाद अजमेर, अमरावती-तिरूपती गाडी आठवड्यातून तीन वेळा आणि नांदेड-श्रीगंगानगर गाडी दररोज चालविण्याचा प्रस्ताव खासदार आणि बाछुका यांनी रेल्वे अधिकार्‍यांना दिला. नांदेड- नवी दिल्ली ही नवीन गाडी पूर्णा, अकोला, भुसावळ मार्गे सुरू करणे, सिकंदराबादकरिता पूर्णा, अकोला, जळगाव, औरंगाबाद-नागपूर गाडी पूर्णा, अकोला मार्गे गाडी सुरू करणे, रात्रीच्या प्रवासाकरिता अकोला-सिकंदराबाद-हैदराबाद-काचीगुडा गाडी सुरू करणे, अकोला, परभणी, जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद गाडी सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोला मार्गे धावणार्‍या गाड्यांचा वेग वाढविणे आणि तिरुपती-अमरावती व नांदेड-श्रीगंगानगर या लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये पेन्ट्रीकार सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Discussion with railway officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.