विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विकासावर हवी चर्चा!
By Admin | Updated: December 14, 2015 02:43 IST2015-12-14T02:43:47+5:302015-12-14T02:43:47+5:30
परिचर्चेत उमटला सूर; केवळ मोर्चे व सहलीचे अधिवेशन ठरू नये.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विकासावर हवी चर्चा!
अकोला: विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि सहलीपुरतेच ठरू नये, तर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असा सूर शनिवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील शेती, सिंचन व इतर विषयासंबंधी विकासाच्या मुद्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे; प्रत्यक्षात मात्र विकासाच्या मुद्यावर पाहिजे त्या प्रमाणात या अधिवेशनात चर्चा होत नाही. अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी कमी असतो, आणि उपलब्ध कमी वेळेत विकासाच्या मुद्यावर हवी तशी चर्चा होत नाही. विकासाच्या दृष्टीने नागपूर येथील विधिमंडळाचे अधिवेशन अपेक्षेप्रमाणे उपयुक्त ठरत नाही. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न आमदारांकडून केले जातात; मात्र विकासाच्या मुद्यांवर हवी तशी भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि लोकप्रतिनिधींच्या सहलीपुरतेच न ठरता, विकासाच्या मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असे मत विविध राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात विकासावर चर्चा करण्याच्या मुद्याला प्राधान्य दिल्या गेले असते तर, विदर्भातील अनुशेष शिल्लक राहिला नसता, त्यामुळे अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.