दिव्यांगांना आता अकोला स्थानकावरच मिळणार प्रवास सवलतीचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:05 IST2020-06-24T19:05:23+5:302020-06-24T19:05:30+5:30
मध्य रेल्वेने आता अकोला, मलकापूर व अमरावतीसह नऊ रेल्वेस्थानकांवर दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दिव्यांगांना आता अकोला स्थानकावरच मिळणार प्रवास सवलतीचे प्रमाणपत्र
अकोला : रेल्वेत प्रवास करताना दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्याच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी स्थानिक रेल्वेस्थानकावर अर्ज केल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या भूसावळ येथील विभागीय कार्यालयात हेलपाटे घेण्याची गरज राहणार नाही. मध्य रेल्वेने आता अकोला, मलकापूर व अमरावतीसह नऊ रेल्वेस्थानकांवर दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय रेल्वेकडून प्रवासी भाड्यात विविध प्रकारची सुट दिल्या जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवासी भाड्यात सुट मिळते. याकरिता संबंधित व्यक्तीला रेल्वेचे तिकीट काढताना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागते. भारतीय रेल्वे दिव्यांग व्यक्तींना आरक्षित प्रवासी तिकीट काढण्यासाठी एक आॅनलाइन विशिष्ट कार्ड देत आहे. हे विशिष्ट आयडी कार्ड प्राप्त करण्यासाठी ठराविक कागदपत्रांसोबत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. स्थानिक रेल्वेस्थानकावर अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी भूसावळ येथे होते. अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदारास भूसावळ येथे बोलावून त्याला प्रमाणपत्र दिले जाते. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर आता मध्य रेल्वेने अर्जदारांना आता अकोला, मलकापूर, अमरावतीसह नऊ रेल्वेस्थानकांवर हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे. सबंधित अर्जदाराला त्याबाबतची सूचना दुरध्वनीवरून दिली जाईल. त्यामुळे अकोला येथील दिव्यांग अर्जदारांना आता अकोला रेल्वेस्थानकारील आरक्षण कार्यालयातून प्रवास सवलतीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
या स्थानकांवर मिळणार प्रमाणपत्र
भुसावळ रेल्वे विभागांतर्गत असलेल्या अकोल्यासह मलकापूर, अमरावती, नाशिक, मनमाड, जळगाव, धुळे, मध्य प्रदेशातील खंडवा आणि बुरहानपूर रेल्वे स्थानकांच्या आरक्षण कार्यालयांकडून दिव्यांगांना सवलतीचे प्रमाणपत्र दिले जाणार आह.