रुग्ण व नातेवाइकांना मिळणार जेवणाचे डबे!
By Admin | Updated: August 3, 2016 01:43 IST2016-08-03T01:43:11+5:302016-08-03T01:43:11+5:30
भावप्रसाद ट्रस्टचा पुढाकार : सदस्य पुरवणार दर गुरुवारी जेवणाचे डबे.

रुग्ण व नातेवाइकांना मिळणार जेवणाचे डबे!
अकोला: कोणी नातेवाईक नाही, खिशात जेवणाचा डबा घेण्याइतपत खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत दोन वेळच्या अन्नाची गरज कशी भागवावी, अशी चिंता सर्वोपचार रुग्णालयात भरती होणार्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सतावते. त्यांची गरज लक्षात घेता, कोणीही उपाशीपोटी राहू नये, या उदात्त हेतूने कौलखेड परिसरातील भावप्रसाद ट्रस्टने दर गुरुवारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी भाजी व पोळीचे डबे पुरणविण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न समारंभ, इतर कार्यक्रमांमध्ये बरेच अन्न वाया जाते. घरातही अन्न शिल्लक राहते. अनेकदा ते अन्न फेकून दिल्या जाते; परंतु बाहेरही शेकडो गोरगरीब अन्नावाचून भुकेले आहेत. याचा आम्ही कसाही विचार करीत नाही. सर्वोपचार रुग्णालयामध्ये पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ातून दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात. रुग्णालयात आल्यावर त्यांना आठ, पंधरा दिवस भरती राहावे लागते. शहरात कोणी नातेवाईक नाही, ओळखीचं कोणीच नाही. खिशात पुरेसा पैसा नाही. दोन वेळचं जेवण घ्यावं तरी कोठून? अशी चिंता सतावते. रुग्णांना रुग्णालयाकडून जेवण दिल्या जातं; परंतु नातेवाइकांना जेवण मिळत नाही. रुग्णालयामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक संस्था अन्नदान करतात; परंतु या संस्था खिचडी वाटप करतात. भाजी -पोळी कोणी देत नाही. ही बाब लक्षात घेऊन आणि रुग्ण व नातेवाइकांची गरज लक्षात घेऊन कौलखेड, खेतान नगर परिसरातील काही सेवाभावी नागरिकांनी एकत्र येऊन भावप्रसाद ट्रस्ट स्थापन केली आणि या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना येत्या गुरुवारपासून जेवणाचे डबे पुरविण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम केवळ सेवाभाव म्हणून भावप्रसाद ट्रस्ट सुरू करणार आहे. संत गजानन महाराजांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. महाराजांनीसुद्धा पत्रावळीवरील भाताची शिते वेचून खाल्ली आणि समाजाला अन्नदानाचा संदेश दिला. त्यामुळेच दर गुरुवारी जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्याचा भावप्रसाद ट्रस्टचा मानस आहे. ही संकल्पना सुरेश टोहारे यांची असून, त्यांच्या या संकल्पनेला हनुमंत आगरकर, सागर विखे, कुणाल शिंदे, महावीर जैन यांच्यासह ट्रस्टमधील सदस्यांनी मुर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.