Dilipkumar Sananda Meet Balasaheb Ambedkar in Akola | दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्यात भेट
दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्यात भेट

 - योगेश फरपट। 
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : वंचीत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यातील यशवंत बंगल्यावर भेट घेतली. दिलीपकुमार सानंदा हे वंचीत बहुजन आघाडीत तर जात नाही ना ? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र दिलीपकुमार सानंदा यांनी ही भेट औपचारिक भेट असल्याचे सांगत बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. 
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. गेल्या आठवड्यात माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खामगावात दिलीपकुमार सानंदा यांची भेट घेतली होती. तेव्हा दिलीपकुमार सानंदा भाजपमध्ये प्रवेश घेतात की काय? याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आता ४ जून रोजी सानंदा यांनी अकोल्यात वंचीत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. याठिकाणी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थीत होते. बाळासाहेब व सानंदा यांच्यात  आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्वांसमक्ष खुली चर्चा झाली. यासंदर्भात दिलीपकुमार सानंदा यांच्याशी विचारणा केली असतांना त्यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकिर्दीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. अकोला असो की मुंबई जेव्हा बाळासाहेबांची भेट शक्य आहे, तेव्हा मी त्यांची भेट घेत असतो. मंगळवारी सकाळी अकोल्यात त्यांची घेतलेली भेट ही सुद्धा औपचारिक भेट आहे. १९९९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात जेव्हा खामगाव होते. तेव्हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरली होती. तेव्हा त्यांच्याशी जवळचा संबध आला होता. तेव्हापासून त्यांच्याशी स्नेह वृद्धींगत होत गेला. मला आमदार बनविण्यासाठी सुद्धा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. काँग्रेस व भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी) हा समविचारी पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या मी नेहमी संपर्कात असतो. मी काँग्रेस पक्षाशी बांधिल आहे. एका राजकीय व्यक्तीने दुसºया पक्षाच्या नेत्याची भेट घेण्यात गैर नाही. त्यामुळे कुणीही उलटसुलट चर्चा करू नये असे सानंदा म्हणाले. 

‘वंचित’च्या पदाधिकाºयांना सत्तेत पाहायचंय ! 
गेल्या कित्येक वर्षापासून काही पदाधिकारी भारिप बहुजन महासंघासोबत आहे. अशा निष्ठावंंत कार्यकर्त्यांसह पदाधिकाºयांना सत्तेत पाहायचे आहे. यासाठी मदत करायला तयार असल्याची ग्वाही दिलीपकुमार सानंदा यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.


Web Title: Dilipkumar Sananda Meet Balasaheb Ambedkar in Akola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.