अन्नत्याग करणारा शेतकरी रुग्णालयात दाखल
By Admin | Updated: July 17, 2015 01:55 IST2015-07-17T01:55:28+5:302015-07-17T01:55:28+5:30
अतिदक्षता विभागात उपचार सुरु.

अन्नत्याग करणारा शेतकरी रुग्णालयात दाखल
बुलडाणा : पावसाने दिलेली ओढ आणि डोक्यावरील कर्जाची चिंता यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अन्नत्याग केलेल्या गिरडा येथील शेतकरी तेजराव शामराव लोखंडे यांना अखेर बुधवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. बुलडाणा तालुक्यातील अल्पभुधारक शेतकरी तेजराव शामराव लोखंडे यांच्याकडे पाडळी येथील सेंट्रल बँकेचे कर्ज थकीत आहे. पेरणीसाठी पुन्हा त्यांना ग्रामीण बँकेचे कर्ज काढावे लागले. पावसाने चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांनी परेणीही केली. यानंतर मात्र पावसाने डोळे वटारले. परिणामी उगवलेले पीक जळून गेले. आता दुबार पेरणीसाठी पैसा कोठून आणायचा आणि यापूर्वीचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने लोखंडे यांना ग्रासले आणि गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार दीपक बाजड यांनी तातडीने गिरडा येथे रुग्णवाहीका पाठवून त्यांना बुधवारी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
*शासन योग्य ती मदत करेल
तेजराव लोखंडे यांच्यावर सेंट्रल बँक व ग्रामीण बँकेचे कर्ज आहे. सध्या त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना किडणी तसेच इतरही आजार आहेत. यापूर्वी ते रुग्णालयात उपचारासाठी भरती होते. त्यांच्या घरची परिस्थितीसुध्दा हलाखीचीच असून त्यांना प्रशासनाच्यावतीने योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन बुलडाण्याचे तहसीलदार दीपक बाजड यांनी दिले.