स्मशानभूमींचा विकास, रस्त्यांची कामे रेंगाळली
By Admin | Updated: May 6, 2015 01:01 IST2015-05-06T01:01:51+5:302015-05-06T01:01:51+5:30
५.७२ कोटींची कामे केव्हा पूर्ण होणार?

स्मशानभूमींचा विकास, रस्त्यांची कामे रेंगाळली
संतोष येलकर/अकोला : जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्माशानभूमी विकास, स्मशानभूमी शेड आाणि सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांसाठी जिल्ह्यातील १८0 ग्रामपंचायतींना चार महिन्यांपूर्वी ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हा परिषदमार्फत वितरित करण्यात आला; मात्र या निधीतून स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यात आल्याबाबतचा अहवाल जिल्हय़ातील एकाही पंचायत समितीकडून अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे निधी वितरित करण्यात आला असला तरी, रेंगाळलेली स्मशानभूमी विकासाची कामे ग्रामपंचायतींकडून केव्हा पूर्ण होणार, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.
सन २0१४-१५ यावर्षी जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा इत्यादी सातही तालुक्यात स्मशानभूमी विकास, स्मशानभमूी शेड व सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांसाठी १८0 ग्रामपंचायतींकरिता ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी २ कोटी ५0 लाख आणि १३३ लहान ग्रामपंचायतींसाठी ३ कोटी २२ लाखांच्या निधीसह एकूण १८0 ग्रामपंचायतींना ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध झालेला हा निधी संबंधित ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी ८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदमार्फत सातही पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आला. जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमींच्या विकास कामांसाठी पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींना निधी वितरित करण्यात आला. निधी उपलब्ध असताना गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८0 ग्रामपंचायती अंतर्गत स्मशानभूमी विकास, रस्ते व स्मशानभूमी शेडची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही.
काही ग्रामपंचायतींकडून कामाना अद्याप सुरुवातही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कामे पूर्ण झाल्याबाबतचा अहवाल जिल्ह्यातील एकाही पंचायत समितीकडून २ मे पर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला नाही.त्यामुळे जनसुविधा अंतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमींच्या विकासाची रेंगाळलेली कामे ग्रामपंचायतींकडून केव्हा पूर्ण होणार, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.