देशभरात १११ जलमार्ग विकसित करणार- गडकरी

By Admin | Updated: April 5, 2016 01:34 IST2016-04-05T01:34:52+5:302016-04-05T01:34:52+5:30

वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

Development of 111 waterways across the country: Gadkari | देशभरात १११ जलमार्ग विकसित करणार- गडकरी

देशभरात १११ जलमार्ग विकसित करणार- गडकरी

वाशिम : देशात सध्या रस्ते, रेल्वेच्या मार्गानेच वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक खर्चिक असून, यापेक्षा कितीतरी पटीने जलवाहतूक स्वस्त आहे. म्हणूनच विकसित देशांमध्ये जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. याच उद्देशाने भारतातही १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, त्याकरिता एक लाख कोटी रुपयांची तरतूद करून करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा सोमवारी वाशिम येथे आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील ६७९१ कोटी रुपयांचे रस्ते, उड्डाणपूल विकास कामांच्या कोनशिला अनावरणप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
शेतकर्‍यांना संकटांचा सामना करावा लागत असून, शेतमालाचे उत्पादन घटत आहे. शेतीला पाणी मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास शक्यच नाही, असे स्पष्ट करून, पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. देशातील १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्यास लोकसभेने मान्यता दिली असून, त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २0 नद्यांच्या बाजूला वॉटर प्लँट विकसित करावयाचा असून, येथे पर्यटन विकसीत होऊ शकेल. या नद्यांमध्ये वर्षभर तीन मीटर पाणी राहिल, असे तंत्रज्ञान विकसित केले जाईल. जलवाहतुकीमुळे वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होईल. रस्ते, रेल्वे यापेक्षाही जलवाहतूक स्वस्त व सुलभ आहे. परदेशात जवळपास ४0 टक्के प्रवासी आणि माल वाहतूक पाण्यातून होते. भारतात हे प्रमाण केवळ ३.५ टक्के असून, ते वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खा. राजीव सातव, खा. संजय धोत्रे, खा. प्रतापराव जाधव, आमदार राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. श्रीकांत देशपांडे, आ. अमित झनक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदारांची कोपरखळी
सेना-भाजपच्या ताणलेल्या संबंधांचा धागा पकडत, काँग्रेसचे खासदार राजीव सातव म्हणाले, आम्ही १५ वर्षे सत्तेत होतो, आता विरोधकांची भूमिका कशी पार पाडावी, हे शिवसेनेकडून शिकायला मिळत आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, विरोधकाची भूमिका काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यात ठासून भरली आहे. काँग्रेसमध्ये एका नेत्याचा दुसर्‍या नेत्याला हमखास विरोध असतो. काँग्रेसमध्ये एकमेकांनाच विरोध करण्याचे प्रमाण जास्त असल्याने, त्यांना विरोधकाची भूमिका शिवसेना शिकवूच शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Development of 111 waterways across the country: Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.